

पंढरपूर : विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने भाविकांना नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशी अर्चन पूजा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दि. 25 रोजी पहिल्याच दिवशी विठ्ठल व रुक्मिणीमातेच्या सर्व पूजांसाठी ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाली आहे. या पूजा दि. 1 एप्रिल ते 31 जुलै या कालावधीत भाविकांना करता येणार आहेत. या पूजांद्वारे मंदिर समितीला 88 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
यामध्ये विठ्ठल नित्यपूजा 148, रुक्मिणीमाता नित्यपूजा 150, पाद्यपूजा 354, तुळशी अर्चन पूजा 1040 तसेच महानैवेद्य सहभाग योजना 145 अशा सर्व पूजांसाठी भाविकांनी उत्साहाने नोंदणी केली. मंदिर समितीच्या संकेतस्थळामार्फत भाविकांना घरबसल्या पूजेची नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
विदेशातून 17000 व्ह्यूज
युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंगडम, युनायटेड अरब अमिराती, जर्मनी, कॅनडा, नायजेरिया, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड, नेपाळ, हंगेरी, नॉर्वे, काँगो (किन्शासा), फ्रान्स, कुवेत, स्वीडन, चीन, श्रीलंका आदी सुमारे 20 देशांमधून मंदिर समितीच्या संकेतस्थळास सुमारे 17 हजार व्ह्यूज नोंदविले आहेत.