

पंढरपूर : दर्शनरांगेतील बॅरेकेडींग कामाच्या ई-निविदे संदर्भात प्राप्त तक्रारी व गोशाळेतील नवजात वासराच्या मृत्यूप्रकरणी चौकशीसाठी अॅड. माधवीताई निगडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीला पुढील 8 दिवसात चौकशी अहवाल देणार आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे. तोपर्यंत मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिरातील कार्यालयात दि. 23 जुलै रोजी सहअध्यक्ष औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस सदस्या शकुंतलाताई नडगिरे, डॉ. दिनेश कदम, संभाजी शिंदे, अॅड. माधवीताई निगडे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, अतुलशास्त्री भगरे गुरूजी, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व लेखा अधिकारी मुकेश अनेचा उपस्थित होते.
दर्शनरांगेतील बॅरेकेडींग कामाच्या ई-निविदे संदर्भात पुरुषोत्तम सग्गम सोलापूर यांनी आर्थिक फसवणूक झाल्याच्या तक्रारी संदर्भात समाजमाध्यमांत बातमी प्रसिध्द झाली होती. काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. त्या अनुषंगाने मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांना नोटीस बजावून खुलासा घेण्यात आला होता. तसेच गोशाळेतील नवजात वासराच्या मृत्यूबाबतदेखील योगेश पाठक व तानाजी जाधव यांच्यावर पंढरपूर शहर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पशुवैद्यकीय अधिकारी व तत्कालिन विभाग प्रमुख डॉ. प्रशांत सर्वगोड व सध्याचे विभाग प्रमुख पांडुरंग बुरांडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. या दोन्ही घटनांची सखोल चौकशी करुन दोषी असणार्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.
दर्शनरांगेतील बॅरेकेडींग कामाच्या ई-निविदे संदर्भात व गोशाळेतील नवजात वासराच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती मंदिर समितीच्या सदस्या अॅड. माधवीताई निगडे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आली आहे. त्यामध्ये शकुंतलाताई नडगिरे, डॉ. दिनेश कदम, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर यांचा सदस्य पदावर समावेश करण्यात आला आहे. सदरची समिती पुढील 8 दिवसात चौकशी करून मुख्य समितीसमोर अहवाल सादर करणार आहे.