Pandharpur News| विठ्ठल-रुक्मिणीचे 27 जूनपासून 24 तास दर्शन
पंढरपूर : आषाढी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. या आषाढी यात्रा कालावधीत येणार्या भाविकांना मंदिर समितीमार्फत मुबलक सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच भाविकांचे सुलभ व जलद दर्शन व्हावे, यासाठी दि. 27 जूनपासून 24 तास दर्शन व्यवस्था उपलब्ध होणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
आषाढी यात्रेच्या अनुषंगाने मंदिर समितीची बैठक सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवास येथे संपन्न झाली. या बैठकीस मंदिर समितीचे सदस्य शकुंतलाताई नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, भास्करगिरी बाबा, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख-जळगावकर, माधवी निगडे, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, लेखा अधिकारी मुकेश अनेचा तसेच पुरातत्त्व विभागाचे रामेश्वर निपाणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्रीनिवास गुजरे, वास्तुविशारद तेजस्विनी आफळे, जतन व संवर्धनाचे ठेकेदार उपस्थित होते.
शुद्ध आषाढी एकादशी दि. 6 जुलै रोजी आहे. यात्रेचा कालावधी दि.26 जून ते दि.10 जुलै असा आहे. शासकीय महापूजा 2.20 वाजता मा. मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य व मानाचे वारकरी यांचे हस्ते सपत्नीक श्रींची शासकीय महापूजा केली जाणार आहे. श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिर जतन व संवर्धन आराखड्यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर जतन व संवर्धनाची सध्या सुरू असलेली सर्व कामे अंतिम टप्प्यात आहेत. टोकन दर्शन प्रणालीची दि. 15 जून रोजी पहिली चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
दर्शनरांगेत बॅरिकेडिंग करून वॉटरप्रूफ मंडप, 4+6 पत्राशेड, विश्रांती कक्ष, फॅब्रिकेटेड शौचालये, लाईव्ह दर्शन, कुलर फॅन, सार्वजनिक सूचना प्रणाली, मिनरल वॉटर, सुरक्षा रक्षक नियुक्ती, आपत्कालीन सुविधा, चहा खिचडी वाटप, आरोग्य व्यवस्थेचे स्टॉल, 24 तास अन्नछत्र, बॅग स्कॅनर मशिन, हिरकणी कक्ष, नदीपात्रात चेंजिंग रूम आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, ती सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
आषाढी यात्रेचे मुख्यमंत्र्यांना देणार निमंत्रण
आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दि.16 किंवा 17 जून रोजी मंदिर समितीच्या वतीने निमंत्रण देण्यात येणार असल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले.
चंदन उटी पूजेची होणार सांगता
चंदनउटी पूजेची दि. 13 जून रोजी सांगता पूजा होणार असून, श्री विठ्ठल व श्री रूक्मिणीमातेची चंदनउटी पूजा अनुक्रमे सदस्या माधवी निगडे व कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके. तसेच सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख-जळगावकर व व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते संपन्न होत आहे.

