Vitthal Rukmini wedding: सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागलं!

श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचा शाही विवाह सोहळा उत्साहात; राज्यभरातील वऱ्हाडींची गर्दी
Vitthal Rukmini wedding
Vitthal Rukmini wedding: सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागलं!Pudhari Photo
Published on
Updated on
सुरेश गायकवाड

पंढरपूर : वसंत पंचमीच्या शुभमुहूर्तावर श्री विठ्ठल सभामंडप येथे शुक्रवारी (दि. 23) श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा परंपरेनुसार दुपारी 12 च्या सुमारास झाला. वऱ्हाडी मंडळींनी विवाह सोहळा होताच टाळ्या वाजवत, ‌‘या पंढरपुरात काय वाजतं गाजतं, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागलं‌’ या गाण्यावर ठेका धरला. त्यामुळे लग्नस्थळी आनंदाला उधाण आले.

वसंत पंचमीच्या मुहूर्तावर शुक्रवारी श्री विठ्ठल मंदिरातील विठ्ठल-रुक्मिणीच्या लग्नाची लगीन घाई सुरू झाली. विठ्ठल मंदिरातील विठ्ठल सभामंडप सजविण्यात आला होता. मंदिरातही आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. एरवी टाळ-मृदंगाच्या व विठ्ठल-रुक्मिणीच्या नामघोषणेने गजबजणाऱ्या मंदिरात सकाळपासून सनई चौघडे, मंगल अक्षता याचबरोबर वऱ्हाडी मंडळींची लगबग सुरू होती. मंदिरात व मंदिराबाहेर अक्षता घेऊन हजारो वऱ्हाडी मंडळी उपस्थित होती.

सकाळी श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेला शुभ्र वस्त्र तसेच रुक्मिणी मातेस मोत्याचे दागिने, नथ आणि अलंकार परिधान करण्यात आले होते. रुक्मिणी मातेच्या गर्भागृहातून गुलाल श्री.विठ्ठलाकडे नेण्यात आला. तिथे गुलालाची उधळण केल्यानंतर श्री विठ्ठलाचा गुलाल रुक्मिणी मातेकडे नेण्यात आला. तिथेही गुलालाची उधळण करण्यात आली.

दुपारी 12 वाजता श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेची अलंकाराने सजवलेली उत्सवमूर्ती या विवाह सोहळय़ाच्या ठिकाणी म्हणजे श्री.विठ्ठल सभामंडपातील फुलांनी सजविण्यात आलेल्या शाही मंडपात आणण्यात आली. दोन्ही देवतास मुंडावळ्या बांधण्यात आल्या. यानंतर अंतरपाट धरले आणि मंगलाष्टकास सुरवात झाली. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मंगलाष्टका म्हटल्यानंतर वऱ्हाडी मंडळींनी टाळ्या वाजवत ‌‘पंढरपुरात काय वाजतं गाजत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागलं‌’, या गाण्यावर ठेका धरला.

यावेळी सदस्या शकुंतलाताई नडगिरे, संभाजी शिंदे, ॲड. माधवीताई निगडे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, डॉ. प्रणिता भालके, लेखा अधिकारी मुकेश अनेचा, विभाग प्रमुख पृथ्वीराज राऊत, संजय कोकीळ, अतुल बक्षी व राजेंद्र सुभेदार उपस्थित होते.सायंकाळी श्री विठ्ठल रुक्मिणी च्या रथातून विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती ठेवून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news