

पंढरपूर : उजनी व वीर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला होता. त्यामुळे आषाढी यात्रेपूर्वीच चंद्रभागेला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, आषाढी यात्रेत पूरपरिस्थिती उद्भवू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने नियोजन करुन अगोदरच उजनी व वीर धरणातून पाणी भीमा नदीत सोडले होते.
जर वारी काळात पाऊस झाला तर धरणांमध्ये पाणी साठवण क्षमता तयार करुन ठेवली आहे. शुक्रवारी सकाळपासून उजनीतून 6600 क्युसेक तर वीरमधून 4974 क्युसेक विसर्ग सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी 63 हजार क्युसेक असणारा विसर्ग कमी करुन तो 11600 वर आणण्यात आला आहे. त्यामुळे दोन दिवसात चंद्रभागा वाळवंट उघडे होणार आहे.
मागील आठवड्यात वीर धरण व उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू होता. त्यामुळे धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वीर धरणातून नीरा नदीत तर उजनी धरणातून भीमा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. त्यामुळे हा पाण्याचा विसर्ग पंढरपूर येथे 63 हजार 960 इतका येत होता. या पाण्याने चंद्रभागा नदीवरील दगडी पूल पाण्याखाली गेला आहे, तर वाळवंटातील मंदिरांना पाण्याने वेढा दिला आहे. छोटी मंदिर पाण्यात बुडाली आहेत. तर पुंडलिक व इतर मोठी व उंच मंदिर पाण्यात अर्धी बुडाली आहेत. पाणी महाद्वार, विप्रदत्त घाटाला लागले आहे. यामुळे सध्यातरी चंद्रभागा नदीपात्रात पाय ठेवायला जागा नसल्याने भाविक घाटाच्या पायर्यांवर थांबून स्नान करत असल्याचे चित्र दिसत आहे.
दरम्यान, शुक्रवार, दि. 27 पासून उजनी व वीरमधील विसर्ग कमी करण्यात आला आहे. सध्या उजनीतून 6600 क्युसेक तर वीरमधून 4974 क्युसेक विसर्ग सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी 63 हजार क्युसेक असणार विसर्ग कमी करुन तो 11600 वर आणण्यात आला आहे. पाणी कमी होणार असल्याने भाविकांना सुरक्षितपणे स्नान करता येणार आहे. त्यामुळे वारकरी, भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
चंद्रभागा नदीला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यातच आषाढी यात्रेला येण्यासाठी पालख्या, दिंड्या पंढरपूरकडे येत आहेत. त्यामुळे पंढरपूरात चंद्रभागा स्नानासाठी व श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांची गर्दीही वाढत आहे. याचा विचार करुन स्नानासाठी येणार्या भाविकांना नदीपात्रात सुरक्षा पुरवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनच्या 10 टीम स्पीड बोटीसह तैनात करण्यात आलेल्या आहेत. जीवरक्षक दल नदी किनारी थांबून सेवा पुरवत आहेत.