

पंढरपूर : आषाढी यात्रेला वारकर्यांची आणि भाविकांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेता, त्यांना सुलभ व जलद दर्शन मिळावे, म्हणून यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे 24 तास मुखदर्शन, तर 22 तास 15 मिनिटे पदस्पर्श दर्शन शुक्रवारपासून (दि. 27) सुरू करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
आषाढी यात्रेला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, त्यांना सुलभ व जलद दर्शन मिळावे, म्हणून यात्रा कालावधीत चांगला मुहूर्त व दिवस पाहून ‘श्रीं’चा पलंग काढून भाविकांना 24 तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येते. त्यानुसार शुक्रवारी (दि. 27) विधिवत पूजा करून पलंग काढण्यात आला. विठ्ठलाच्या मूर्तीच्या पाठीशी लोड, तर रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पाठीशी तक्क्या लावण्यात येतो.
सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य शकुंतला नडगिरे, अॅड. माधवी निगडे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, विभागप्रमुख संजय कोकीळ, अतुल बक्षी व पौरोहित्य करणारे कर्मचारी उपस्थित होते.