

मोडनिंब : पंढरपूर येथील आषाढी एकादशीच्या मुख्य सोहळ्यानंतर आज मंगळवारी विठ्ठलाच्या पादुकांचा पालखी सोहळा संत सावता महाराजांना भेटण्यासाठी अरण (ता. माढा) येथे दाखल झाला. विठ्ठलनामाच्या गजरात हजारो भाविकांनी देवाचा आणि भक्ताचा सोहळा अनुभवला.
आषाढी एकादशीला विविध संतांच्या पालख्या विठ्ठलाच्या भेटीसाठी येतात; मात्र पांडुरंग स्वत: आपले भक्त संत सावता महाराजांना भेटण्यासाठी येतात. हे या भेटीचे वैशिष्ट्य आहे. रविवार, 20 जुलै रोजी पंढरपूर येथून विठ्ठलाच्या पादुकांची पालखी अरणमध्ये दाखल होताच हजारो वारकर्यांनी टाळ-मृदुंगासह विठ्ठल नामाचा गजर केला.
विठुरायाच्या पालखीच्या स्वागतासाठी अरण ग्रामपंचायतीचे सरपंच सुरत्नप्रभा ताकतोडे, माजी सभापती भारत शिंदे, माजी सभापती शिवाजी कांबळे, संत सावतेबुवा महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठल गाजरे, सचिव विजय शिंदे व उपसरपंच वसंत इंगळे आदी उपस्थित होते. सायंकाळी उशिरा ग्रामप्रदक्षिणा होऊन पांडुरंगाची पालखी समाधी मंदिरात नेण्यात आली. याठिकाणी देवभेटीचा सोहळा पार पडल्यानंतर पालखी शिंदे वाड्यात विसावली. दि. 24 रोजी आमावस्येला काल्यानिमित श्रीफळ हांडी साजरा होऊन पालखी सोहळ्याची सांगता होणार आहे. श्रीफळ हंडी सोहळा थेट राज्यभर दिसावा म्हणून त्याचे थेट प्रसारण करण्यात येणार आहे.श्री विठ्ठलाच्या पालखी सोहळ्याला दोनशे वर्षांची परंपरा आहे असे वारकरी सांगतात.