

वेळापूर : शासनाने विकासाच्या नावाखाली सुरू केलेला हा प्रकल्प आमच्या पोटावर पाय देणारा आहे. पिढ्यान्पिढ्या कष्ट करून कमावलेली सुपीक शेती आणि हक्काची घरे आम्ही कोणत्याही परिस्थितीत उद्ध्वस्त होऊ देणार नाही. शेती वाचली तरच गाव आणि संस्कृती वाचेल, असा आक्रमक पवित्रा घेत वेळापूर आणि परिसरातील शेतकऱ्यांनी प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे.
वेळापूर येथे या महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांची एक महत्त्वपूर्ण आणि तातडीची बैठक पार पडली. या बैठकीला वेळापूरसह परिसरातील बागायतदार आणि बाधित शेतकरी उपस्थित होते. या बैठकीस संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष किसान सेल राज्य कार्याध्यक्ष कमलाकर माने-देशमुख यांनी याबाबत माहिती दिली. तर ज्येष्ठ शेतकरी, तरुण व्यावसायिक यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली. वेळापूर, माळशिरस आणि सोलापूर जिल्ह्यातील हा पट्टा ऊस, फळबागा आणि नगदी पिकांसाठी ओळखला जातो.
या महामार्गाच्या आखणीत हजारो एकर सुपीक आणि बारमाही ओलिताखालील जमीन जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. महामार्गामुळे आमची सुपीक शेती तर जाईलच, पण ज्या जमिनींवर आमची उपजीविका अवलंबून आहे, त्याही नष्ट होतील. अनेक शेतकऱ्यांची घरे या आराखड्यात बाधित होत आहेत. या वयात आम्ही आमचा संसार पुन्हा कसा उभा करायचा? असा सवाल बैठकीत उपस्थित महिला शेतकऱ्यांनी उपस्थित केला.
बैठकीत केवळ चर्चा न करता, प्रशासनाविरोधात लढा अधिक तीव्र करण्यासाठी एकमताने निर्णय घेण्यात आले. यामध्ये प्रत्येक बाधित गावामध्ये ‘शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती’ स्थापन करून लढा तळागाळापर्यंत पोहोचवला जाईल. महामार्गामुळे होणारे नुकसान आणि जमिनींचे कायदेशीर हक्क यावर गावोगावी कोपरा सभा घेऊन शेतकऱ्यांना संघटित केले जाईल. या भागातील लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहावे, यासाठी त्यांची भेट घेऊन भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले जाईल. सुरुवातीला जिल्हाधिकारी आणि प्रांत अधिकाऱ्यांना निवेदने दिली जातील. त्यानंतरही दखल न घेतल्यास जिल्हा अधिकारी कार्यालय येथे तीव्र रस्त्यावरील आंदोलन आणि न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार करण्यात आला.
यावेळी कमलाकर माने-देशमुख यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी बापूसाहेब पनासे, सय्यम काळे, संतोष काशिद, उत्तम काशिद, दत्तात्रय टिक, सचिन इंगोले, संतोष जगताप, अतुल पवार, तुकाराम काशिद, राजू कांबळे, अतुल मोहिते, अनिकेत घाणेकर, दीपक मस्के, विकास माने, सचिन माने-देशमुख, बाळकृष्ण माने-देशमुख, धनाजी माने-देशमुख, महेश माने, विलास माने, सुधाकर माने, शरद माने, भरत माने, विष्णू पिंगळे आदी उपस्थित होते.