

पानीव : माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथील श्रीक्षेत्र वश्यामारुती देवस्थानाजवळील गायरान गट क्र. 233 मधील 10 एकर 12 गुंठे क्षेत्रापैकी 5 एकर क्षेत्र सार्वजनिक वापरासाठी ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच या तीर्थक्षेत्राच्या पर्यटन विकासासाठी 20 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. यामुळे मारकडवाडी वश्यामारुती देवस्थानचा कायापालट होणार आहे.
माजी आमदार राम सातपुते यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना पत्राद्वारे मागणी केली होती. वश्यामारुती देवस्थान हे ‘क’ वर्गातील पर्यटन तीर्थक्षेत्र आहे. येथे भाविकांसोबतच शैक्षणिक सहलीसाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी येतात. भाविक व पर्यटकांना अधिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, तसेच शैक्षणिक सहलींचे योग्य नियोजन करता यावे. या उद्देशाने देवस्थानालगतची गायरान जमीन ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्याची मागणी सातपुते यांनी केली होती.
मुख्यमंत्र्यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. तात्काळ जमिनीच्या हस्तांतरणाचे तसेच पर्यटन विकासासाठी 20 कोटींच्या आराखड्याचे आदेश संबंधित विभागाला दिले असल्याची माहिती माजी आमदार राम सातपुते यांनी दिली.