

सोलापूर : वंदे भारत या एक्सप्रेस गाडीची देखभाल, दुरुस्ती येत्या काळात सोलापुरातच होणार असून या विभागात रेल्वेकडून अनेक विकासाच्या सुविधा निर्माण केली जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाप्रबंधक प्रतीक गोस्वामी यांनी दिली. ते या विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या वाडी, कलबुर्गीसह अन्य ठिकाणांची पाहणी करण्यासाठी आले होते.
यावेळी येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापकाच्या कार्यालयात आयोजित आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉ. सुजित मिश्रा, परिचालन अधिकारी योगेश पाटील यांच्यासह विभागीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
गोस्वामी यांनी सांगितले की, रेल्वे मंत्रालयाकडून सोलापूर विभागात अनेक महत्त्वपूर्ण कामे सुरू आहेत. यापैकी वाडीत रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी पॉलीक्लिनिक व त्यांच्या निवासाचेही कामे सुरू आहेत. टिकेकरवाडीतील कामे पूर्ण झाल्यानंतर येथेच वंदे भारतसह अन्य एक्सप्रेस गाड्यांचे देखभाल दुरूस्तीही केली जाणार आहे. भविष्यात सोलापूरकरांना रेल्वेकडून जास्तीत जास्त चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी टिकेकरवाडीत 50 कोटीची कामे केली असून येथेच अजून 250 कोटीची कामे येत्या वर्षभरात होतील.
सीनेच्या पात्रावर नव्याने पूल उभारले जाणार आहे. शहरातील भैय्या चौकात नव्याने करण्यात येणाऱ्या पुलाचे डिझाईन ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सादर केले. या डिझाईनमध्ये आवश्यकतेनुसार रेल्वेकडून बदल सुचवून मंजुरी दिली जाणार आहे.