

मोहोळ : दरवाज्याच्या समोर झोपलेल्या वयोवृद्ध पती-पत्नीला ओलांडून जात चोरट्यांनी मुख्य दरवाजाची कडी काढून घरात प्रवेश करत कपाटातील ३ लाख २४ हजार रुपये किमतींचे सोन्याचे दागिने व १ लाख ३ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ४ लाख २७ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. चोरी करून जात असताना शेजारच्या वस्तीवरील २० हजार रुपये किमतीची दुचाकीही पळवून नेल्याची घटना मध्यरात्री मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथे घडली.
मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथील लेंगरे बाबर वस्तीवर रणजित राजेंद्र लेंगरे हे कुटुंबासमवेत राहण्यास आहेत. ते शेती करून उपजीविका करतात. दि. ३ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास कुटुंबातील सर्वजण एकत्रित जेवण करून झोपी गेले. त्यांचे आई-वडील घराच्या समोर असलेल्या पोर्चमध्ये झोपले होते, तर भावजय प्रतिभा या त्यांच्या खोलीत झोपल्या होत्या व फिर्यादी रणजित लेंगरे हे जनावरांच्या पत्रा शेडमध्ये झोपले होते.
पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्यांना थंडी वाजू लागल्याने ते घरात झोपण्यासाठी घराजवळ गेले. त्यावेळी घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पोर्चमध्ये झोपलेला आई-वडिलांना झोपेतून उठवून दरवाजा बंद असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी घराच्या खिडकीतून त्यांच्या भावजय प्रतिभा यांना जोरजोरात हाका मारल्या. मात्र त्या उठल्या नाहीत. त्यामुळे रणजित यांनी किचनच्या रूममधून घरात प्रवेश केला. त्यावेळी पाहिले की, त्यांच्या व त्यांच्या भावाच्या खोलीतील कपाट उघडे होते. त्यावेळी त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले.
दोन्हीही खोलीत असलेल्या कपाटातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. त्याचबरोबर रणजित यांच्या कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने चोरीला गेले होते, तर त्यांचा भाऊ अमर याच्याही खोलीत असलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेली होती. जवळच्याच वस्तीवरील चंद्रकांत जगन्नाथ लेंगरे यांची २० हजार रुपये किमतीची दुचाकी घरासमोरून चोरली. त्याचबरोबर गावातील जयंत बाळकृष्ण मोहोळकर, उमेश दत्तात्रय मोहोळकर व राजीव गजानन मोहोळकर यांच्यादेखील घरी चोरी करण्यात आली.