

सोलापूर : प्रदूषण वाढल्याने वातावरणात अनेक अनिष्ट बदल होत आहेत. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीसह प्रदूषणीय आपत्तीमध्ये वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाकडून राज्यातील सर्व महापालिका, नगरपरिषदा, नगरपालिका व नगरपंचायतींच्या हद्दीमध्ये ‘अर्बन फॉरेस्ट’ हा उपक्रम राबवण्यास सुरुवात झाली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रयत्नांतून राज्यात बांबूसह विविध वनस्पतींच्या लागवडीचे क्षेत्र किमान एक लाख हेक्टरपर्यंत वाढविले जाणार आहे.
दरम्यान, राज्यात सर्वात प्रथम ठाणे महापालिकेने सुमारे 16 हून अधिक भूखंड निश्चित करून पर्यावरण संवर्धनाच्या या प्रकल्पावर काम सुरू करत बाजी मारली आहे. ठाण्यातील मोकळ्या जागांवर फळझाडांची लागवड करणे सुरू झाले आहे. रिकामे भूखंड, स्मशानभूमी, रुग्णालये, शाळांच्या परिसरातील मोकळ्या जागेत वृक्षलागवड सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी शेवग्याच्या पाच हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. तसेच, बांबूची लागवडदेखील विविध ठिकाणी केली जात आहे. ठाणे महापालिकेने सुमारे 16 हून अधिक भूखंडांवर पर्यावरण संवर्धन करण्याचे काम सुरू केले आहे.
शहरी भागातील या फॉरेस्ट परिसरामुळे प्रदूषणात घट होणार आहे. पक्षी, प्राण्यांचा शहरी भागातील अधिवास वाढावा यासाठी आंबा, जांभूळ यासह इतर फळे आणि फुलझाडांची लागवड या उपक्रमांतर्गत करण्यात येणार आहे. यापूर्वी शेवग्याच्या पाच हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. तसेच आता बांबूसह विविध वनस्पतींची लागवडदेखील विविध ठिकाणी केली जाणार आहे.