Railway Travel
Railway Travel: रेल्वे प्रवासात विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मारहाणPudhari

Railway Travel: रेल्वे प्रवासात विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मारहाण

आरक्षित डब्यात स्थानिकांशी वाद व धक्काबुक्की, यशाचा गुलाल की जखमांचे वळ?
Published on
दीपक शिराळकर

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे विद्यार्थी म्हैसूर येथील युवा महोत्सवासाठी जात असताना 8 फेब्रुवारी रोजी बेंगलोर ते म्हैसूर रेल्वेत त्यांना मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. कर्नाटक येथे पार पडलेल्या दक्षिण-पश्चिम विभागीय युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी सोलापूर विद्यापीठाचे 50 हून अधिक विद्यार्थी कलाकार रेल्वेच्या आरक्षित डब्यातून प्रवास करीत होते. म्हैसूरच्या अलीकडेच या आरक्षित डब्यात स्थानिक प्रवासी जबरदस्तीने घुसले. त्यावेळी ही वादावाद झाली.

म्हैसूर येथील युवा महोत्सवात सोलापूर विद्यापीठ संघाने घवघवीत यश मिळवले खरे, मात्र या यशाला रक्ताळलेल्या जखमांची किनार लागली आहे. दि 9 ते 14 फेब्रुवारी दरम्यान पार पडलेल्या या स्पर्धेसाठी दि. 7 फेब्रुवारी रोजी सोलापरातून 50 हून अधिक विद्यार्थी रवाना झाले होते. मात्र, बेंगलोर-म्हैसूर रेल्वे प्रवासात स्थानिक नागरिकांकडून यातील काही विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण झाली. या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने विद्यापीठ वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

विद्यार्थी विकास केंद्राच्या संचालकांनी या घटनेला दुजोरा दिला असून विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे रीतसर आरक्षण केले असल्याचे सांगितले. मात्र, बेंगलोर ते म्हैसूर दरम्यान स्थानिक प्रवासी मोठ्या संख्येने आरक्षित डब्यात शिरले. त्यांनी जागा खाली करण्यासाठी विद्यार्थ्यांना धमकावले. विद्यार्थ्यांनी विरोध करताच स्थानिकांनी आक्रमक होत धक्काबुक्की सुरू केली. यावेळी डब्यात काही वेळ चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती.

प्रवासात विद्यार्थ्यांसोबत पाच ते सहा प्राध्यापक उपस्थित होते, त्यांनी मध्यस्थी करत वाद शांत करण्याचा प्रयत्न केला. या विद्यापीठाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या कलाकारांना परराज्यात अशा हिंसक अनुभवाला सामोरे जावे लागल्याने पालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news