

महूद : महाराष्ट्रात एकमेव असलेले श्री पंचलिंगी महादेव मंदिर हे कटफळ (ता. सांगोला) येथे आहे. दिघंची- पंढरपूर रस्त्यावरील उंबरगाव - दडस वाडी गावाजवळ सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत दिघंचीपासून 8 किमी आणि सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत कटफळ येथे असलेले श्री पंचलिंगी महादेव मंदिर हे एक पवित्र धार्मिक व ऐतिहासिक मंदिर आहे.
या मंदिराचा शिवलीलामृत ग्रंथाच्या 11 व्या अध्यायात उल्लेख आढळतो. हे मंदिर सुमारे 7 व्या शतकातील तत्कालीन राजा अशोक सम्राटांच्या राजवटीतील आहे. त्याचा ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत मोठा ठेवा मानला जातो. या मंदिरास एकमेव पंचमुखी शंभू महादेव मंदिर असेही म्हटले जाते. या मंदिराजवळ आदिलशाही साम्राज्यात खवासखान सैन्याचा तळ होता. तसेच त्यावेळी त्या सैनिकांनी या मंदिराची मोडतोड केल्याची आख्यायिका आहे. या मंदिरापासून जवळ असणार्या सोलापूर जिल्ह्यातील गावाला खवासपूर असे नाव पडले आहे. मात्र पूर्वी या गावाला रतनपूर असे नाव होते, अशीही आख्यायिका आहे. तसेच रावणाच्या आईने पुत्र प्राप्तीसाठी याठिकाणी शंकराची तपश्चर्या केल्याची आख्यायिकाही सांगितली जाते.
मंदिरावर शिखर बांधलेले असून कळसारोहण न केल्यामुळे त्याचे उग्र नाव लांडा महादेव असे संबोधले आहे. मंदिराच्या गाभार्यातील दगडावर अशोकचक्राचे चिन्ह आहे. नेपाळ येथील पशुपती मंदिर वगळता भारतात एकमेव कटफळ येथील धुंडा महादेव मंदिरात स्वयंभू पंचलिंगी पिंड आहे. सोलापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील लाखो शिवभक्तांची श्रावण महिन्यात महाशिवरात्रीला या महादेव मंदिरात दर्शनासाठी गर्दी असते.
या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे वातावरणातील तापमानानुसार या मंदिरातील तापमान बदलते. उन्हाळ्यात थंड वातावरण व हिवाळ्यात दमट वातावरण असते. या मंदिरापासून काही अंतरावर ऐतिहासिक पाणपोई आहे. प्राचीन हेमाडपंथी वास्तुशैलीतील श्रीक्षेत्र पंचलिंगी शंभू महादेव मंदिराचे सौंदर्य आणि टिकाऊपणा आजही कायम ठेवत आहे. महाराष्ट्रात पंचमुखी असलेले महादेव मंदिर हे एकमेव असून अत्यंत दुर्मिळ आणि अद्वितीय बाब आहे. जुन्या परंपरेनुसार पहाटे व सायंकाळी होणारी नित्य पूजाविधी व आरती नियमितपणे सुरू आहे.