

मंगळवेढा : मंगळवेढा शहरातून जाणार्या रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील सोलापूरकडे जाणार्या छत्रपती संभाजीराजे चौकातील उड्डाणपुलाखालील सर्व्हिस रोडवर असलेले अंडरग्राऊंड गटारीवरील स्लॅब सध्या धोकादायक अवस्थेत आहे. अशा आशयाची बातमी गुरुवारी दैनिक ‘पुढारी’मध्ये प्रसिद्ध झाली आणि महामार्ग प्राधिकरण तत्काळ कार्यरत झाले. गुरुवारी सकाळी त्या स्लॅबच्या कामाची सुरुवात झाली आहे.
दोन वर्षांपूर्वी मंगळवेढ्यातून सोलापूरकडे जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग विकसित करण्यात आला आहे. मात्र, घाईगडबडीत सदर काम पूर्ण झाले. त्यामुळे या महामार्गावर अनेक त्रुटी दिसतात. काही ठिकाणी काम व्यवस्थित न झाल्याने लगेचच गुणवत्ता ढासळली असल्याचे दिसून आले. यातच सर्व्हिस रोडवरून अतिशय जड वाहने, टू व्हीलर, फोर व्हीलर, एसटी, सोलापूरला जाते. सोलापूरकडून मंगळवेढ्याला येते. धोकादायक स्लॅब हा नेमका उड्डाणपुलाखालील वळणातच आहे. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे, हे वृत्त प्रसिध्द झाले. यानंतर प्रशासन कामाला लागले आहे. दैनिक ‘पुढारी’च्या वृत्ताची दखल घेत काम सुरू झाल्याबद्दल शहरातील नागरिकांकडून दै. ‘पुढारी’चे आभार मानण्यात आले.