

बार्शी : शेतातील विहिरीच्या पाण्याच्या कारणावरून चुलत भावाचा खून केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश विक्रमादित्य मांडे यांनी एकास जन्मठेप व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. महादेव बाजीराव मुंडे (रा. उक्कडगाव) असे जन्मठेपेची शिक्षा देण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पांगरी ते येरमाळा रोडवर दि. 27 जानेवारी 2020 रोजी सायंकाळी सेवानिवृत्त सर्जेराव सोमनाथ मुंढे (वय 61, रा. उक्कडगाव) यांचा खून झाला. सर्जेराव यांच्या पत्नी इंदुबाई यांनी याविषयी पांगरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. आरोपी महादेव बाजीराव मुंडे हे इंदुबाई यांचे चुलत दीर होत. महादेव व मृत सर्जेराव यांची वडिलोपार्जित सहा एकर शेत जमीन आहे. त्याच्या वाटणीवरून मयत सर्जेराव व आरोपी महादेव यांच्यात वाद होता. त्यासाठी दोघांमध्ये बार्शी दिवाणी न्यायालयात खटला दाखल आहे.
आम्हाला हे प्रकरण मिटवायचे नाही. आम्ही तुम्हाला जमीन तसेच विहिरीचे व बोअरचे पाणीदेखील देणार नाही. असे म्हणून आरोपी महादेव हे सर्जेराव यांना जीवे मारण्याची धमकी देत होते. या दरम्यान, उक्कडगाव येथे दि. 27 जानेवारी 2020 रोजी सायंकाळी सर्जेराव यांना महादेव बाजीराव मुंडे, गणेश महादेव मुंडे, बाजीराव कृष्णा मुंडे (सर्व रा. उक्कडगाव) यांनी मागील भांडणाचा राग मनात धरून डोक्यात दगड घालून ठार मारल्याप्रकरणी पांगरी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तत्कालीन तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक प्रवीण शिरसाट यांनी यातील प्रत्यक्ष व अप्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची चौकशी केली. आरोपी महादेव याने मयत सर्जेराव यास मारहाण करून खाली पाडले. एक मोठा दगड उचलून सर्जेराव यांच्या चेहर्यावर मारून त्यांचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
या खटल्यात फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तसेच डॉक्टर, पोलिस कॉन्स्टेबल मनोज जाधव यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सरकार पक्षाकडून 17 साक्षीदार तपासण्यात आले. पुरावा ग्राह्य धरून मुख्य आरोपी महादेव बाजीराव मुंडे याला खून प्रकरणी दोषी ठरवून न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा आणि तीन हजार रुपये दंड शिवाय दंड न भरल्यास एक महिन्याचा साधा कारावासाची शिक्षा सुनावली.
या खटल्यात सरकारी वकील म्हणून दिनेश देशमुख व प्रदीप बोचरे यांनी काम पाहिले. उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल, पांगरीचे सहायक पोलिस निरीक्षक हेमंतकुमार काटकर यांचे मार्गदर्शन लाभले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून प्रभाकर गायकवाड व कुणाल पाटील यांनी काम पाहिले.