

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील लोकांचे आरोग्य उजनी धरणातील पाण्यावर अवलंबून आहे. मात्र उजनी धरणात पुणे जिल्ह्यातून मिसळणार्या सांडपाण्यामुळे धरणातील सर्व म्हणजे 117 टीएमसी पाणी प्रदूषित होत आहे. या प्रदूषित पाण्यामुळे सोलापूरच्या लोकांचे आरोग्य बिघडत आहे. याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याचा आरोप जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी केला.
जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह सोलापूर जिल्हा दौर्यावर आहेत. तत्पूर्वी त्यांनी उजनी धरणाची पाहणी केली. त्यानंतर श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हे मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी उजनी धरणातील पाण्याचे प्रदूषण, श्री सिद्धेश्वर मंदिर तलावातील पाण्याची स्थिती, देशभरातील नदी स्वच्छता मोहीम अशा विविध विषयांवर भाष्य केले.
उजनी धरणातील पाण्यासंदर्भात विविध सहा समित्या गठीत करण्यात येत आहेत. या माध्यमातून या धरणातील जल प्रदूषणासंदर्भात जनजागृती उपाययोजना आणि पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे, असे स्पष्ट करून जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह म्हणाले, या माध्यमातून जल साक्षरता मोहीम राबविण्यात येणार आहे. उजनी धरणातील पाणी प्रदूषणाविषयी लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारला पाहिजे. येथील पाण्याच्या शुद्धतेसंदर्भात दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
पाणी हे तीर्थ आहे, ते शुद्ध असायला हवे. याची जबाबदारी सर्व लोकप्रतिनिधी आणि लोकांचीही आहे. उजनी जलाशयातील प्रदूषित पाण्यामुळे होणार्या गंभीर आजारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील गटाराचे पाणी, मुळा मुठा नदीमार्फत भीमा नदीपासून संपूर्ण उजनी जलाशयाला प्रदूषित करीत आहे. पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकांनी हे सर्व दूषित पाणी ट्रीटमेंट करून रिसायकल केले पाहिजे. परंतु पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका पाणी शुद्धीकरणापेक्षा नोटिफिकेशनला प्राथमिकता देत आहेत, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कोणत्याही प्रकारचे सांडपाणी नदीत पात्रात सोडले नाही पाहिजे. या संदर्भात सोलापूर भागातील लोकांनी मोठ्या प्रमाणात लढा उभारणे गरजेचे आहे. तसेच पुणे जिल्ह्यातीलच पेपर मिलच्या माध्यमातून उजनी धरणाचे पाणी मोठ्याप्रमाणावर प्रदूषित होत आहे.
या पत्रकार परिषदेस जल बिरादरीचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्र चुघ, सत्यनारायण बोलीसेटी, अंकुश नारायणकर, सुनील रहाणे, रमाकांत कुलकर्णी उपस्थित होते.
जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी सोलापुरातील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर तलावाचीही पाहणी केली. या संदर्भात ते म्हणाले. या तलावात घाण पाणी कुठून येते, या तलावातील मासे का मरतात, याचा शोध घेतला पाहिजे. तलावातील पाणी कोण घाण करते हे पाहायला हवे. मंदिर समिती आणि महापालिकेनेही आपापली जबाबदारी पार पाडली पाहिजे. तलावाच्या पाण्यातील ऑक्सिडेशन कमी होत आहे, ते वाढविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी मंदिर समितीने अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर येथील पाणी घाण होऊ नये ही सर्वांची जबाबदारी आहे.