

सोलापूर : उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनीची गेल्या दहा दिवसांपासून चाचणी घेतली जात आहे. दोन दिवसांपूर्वी सोरेगाव पंपगृहामध्ये यशस्वी चाचणी झाल्यानंतर सोमवारी (दि. 2) सकाळी लांबोटीजवळ एअरव्हॉल्व्ह मधून पाईपलाईनचे वॉशआऊट घेण्यात आले. त्यामुुळे 50 ते 60 फूट उंच पाण्याचा फवारा उडाल्याने पाईपलाईन फुटल्याची काही नागरिकांचा समज झाल्याने खळबळ उडाली. मात्र, स्मार्ट सिटीचे तांत्रिक सल्लागार व्यंकटेश चौबे यांनी पाईपलाईन फुटली नसून, या ठिकाणी वॉशआऊट घेण्यात आल्याचा खुलासा केला. त्यानंतर पाईपलाईन फुटल्याच्या घटनेवर पडदा पडला.
उजनी-सोलापूर जलवाहिनी लांबोटीजवळ सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास फुटल्याचा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर सोलापूरमध्ये खळबळ माजली. शहराला पाणीपुरवठा कारणारी उजनी-सोलापूर समांतर नवीन जलवाहनी फुुटल्याची चर्चा सुरु झाली. त्यामुुळे महापालिका प्रशासन जागे झाले. 50 ते 60 फूट उंचच्या उंच पाण्याचा फवारा उडत होता. परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरही पाणीच पाणी झाले होते. घटनास्थळी स्मार्ट सिटीचेे तांत्रिक सल्लागार व्यंकटेश चौबे इतर अधिकारी पोहोचले असता, समांतर जलवाहिनीचे काम करणार्या कंपनीच्यावतीने लांबोटीजवळ एअरवॉलमधून एअर चाचणी आणि वॉशआऊट घेण्यात आल्याचे लक्षात आले. तातडीने पाण्याचा प्रवाह बंद करण्यात आला. मात्र सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.
समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. उजनीचे पाणी पाकणीपर्यंत आले आहे. या पाईपलाईनवर नऊ ठिकाणी वॉशआऊट तर 29 ठिकाणी एअरव्हॉल आहेत. त्यांची चाचणी सुरु आहे.
मंगळवारी (दि. 3) सकाळी पाकणी पंपगृह ते सोरेगाव पंपगृहाकडे पाणी सोडून चाचणी घेतली जाणार आहे. त्यावेळीही अशाचप्रकारे वॉशआऊट घेऊन चाचणी घेतली जाणार असल्याचे चौबे यांनी सांगितले.