

सोलापूर : उजनी धरण परिसरात उभारण्यात येणाऱ्या एआय डेटा सेंटरचा सर्वाधिक फायदा स्थानिक युवकांना होणार आहे. कंपनीसोबत झालेल्या करारानुसार पात्रतेनुसार दोन हजार ८०० स्थानिक बेरोजगारांना थेट रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
ते पुढे म्हणाले, या प्रकल्पामुळे विविध पूरक व्यवसाय, सेवा आणि संबंधित उद्योगांच्या माध्यमातून सुमारे ४० हजार लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे उजनी परिसरासह जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळू शकते.
या प्रकल्पाच्या माध्यमातून राज्य शासनाला सुमारे २०० कोटी रुपयांचा महसूल मिळणार असल्याचे स्पष्ट करून जिल्हाधिकारी म्हणाले, या निधीचा उपयोग पाणीपुरवठा योजनांसाठी करण्यास प्राधान्याने देण्यात येईल. त्यामुळे औद्योगिक गुंतवणुकीसोबतच परिसरातील पायाभूत सुविधांची निर्मिती होईल. त्याचबरोबर पाणीपुरवठा व्यवस्थेलाही बळकटी मिळण्याची अपेक्षा आहे.
प्रस्तावित सौरऊर्जा प्रकल्पासाठी पॅनेल उभारण्याची जागा निश्चित करताना मासेमारी करणाऱ्या बांधवांना विश्वासात घेण्यात येणार आहे. सौरउर्जा प्रकल्पासाठी उजनीचा पृष्ठभाग वापरण्यात येणार असला तरी प्रकल्प निर्मितीमुळे यावर परिणाम होणार नाही. मासेमारी बांधवांच्या पारंपरिक व्यवसायावर परिणाम होणार नाही आणि कोणत्याही परिस्थितीत मासेमारीचा हक्क हिरावून घेतला जाणार नाही, याची काळजी घेतली जाणार असल्याचे स्पष्ट करून जिल्हाधिकारी म्हणाले, उजनीतील पर्यटन, मासेमारी आणि स्थानिकांच्या उपजीविकेच्या साधनांवर विपरीत परिणाम होऊ दिला जाणार नाही.
एआय डेटा सेंटर ही काळाची आणि देशाच्या विकासाची गरज आहे. कोणताही प्रकल्प भविष्यकालिन उपयोगाचा असतो. मोठ्या प्रकल्पाबाबत सुरुवातीला नागरिकांच्या मनात भीती आणि शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे. मात्र, या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे हित, पिण्याच्या पाण्याचा हक्क, शेतीसाठीचे पाणी, उजनी पर्यटन आणि धरणाची शासकीय मालकी या कोणत्याही बाबींवर गदा येणार नाही. स्थानिकांना विश्वासात घेऊनच प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाईल, असे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी स्पष्ट केले.