

सोलापूर : सोलापूरसह पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यासाठी वरदायिनी असणारे उजनी धरण रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर शंभर टक्के भरले. पाटबंधारे खात्याने याविषयी सकाळी सहा वाजता दिलेल्या आकडेवारीनुसार धरणातील पाणीसाठा 116.99 टीएमसीवर पोहोचला. धरणाची टक्केवारी 99.56 गणली गेली. 117 टीएमसी पाणीसाठ्यावर उजनी धरण पूर्ण क्षमतेला पोहोचते.
शनिवारी दुपारी तो टप्पा पार करत उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने सोलापूर जिल्ह्यात समाधान व्यक्त होत आहे. उजनी धरण हे कालव्याच्या माध्यमातून पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यासाठी सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्रोत आहे. गेल्या काही वर्षांपासून पावसाचे अनियमित प्रमाण, वारंवार जाणवणारे दुष्काळाचे सावट आणि पाण्याच्या वाढत्या मागणीमुळे उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरणे अवघड झाले होते. मात्र, यावर्षी पावसाळ्याच्या पहिल्याच टप्प्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे धरणात जलसाठा जलदगतीने वाढत गेला.
जलसंपदा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार धरणाच्या पाणलोट परिसरात झालेल्या सलग पावसामुळे पाणीपातळी सातत्याने वाढत गेली. गेल्या काही दिवसांत धरणातील पाणीसाठ्यात दिवसाला लाखो घनमीटर पाण्याची वाढ होत गेली. शनिवारी सकाळी नोंद झालेल्या आकडेवारीनुसार 116.99 टीएमसी पाणीसाठ्यामुळे धरण प्रत्यक्षात 99.56 टक्के भरले. जे पूर्ण क्षमतेच्या जवळपास आहे.