

परिते : सन 2025 च्या पावसाळी हंगामात उजनी धरणात ऑक्टोबर 25 अखेरपर्यंत 496.830 मीटर पाणी पातळी दिसते. जलाशयात 100 टक्के असा 117.23 टीएमसी एकूण पाणीसाठा व 53.57 टीएमसी जिवंत पाणीसाठा करण्यात आल्याचे दिसून येते. मात्र यावर्षी पाणी साठवण क्षमता 11 टक्के कमी का केली, 6 टीएमसी पाणी कमी का साठवले, याचा परिणाम उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांना भोगावा लागणार का, असे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. याप्रश्नी जलसंपदाचे अधिकारी मात्र टोलवाटोलवीची उत्तरे देत आहेत.
सन 2001 पासून सलग 24 वर्षे प्रत्येकवर्षी 15 ऑक्टोबर किंवा ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत सरकारी पावसाळा गृहित धरुन उजनी धरणात 111.20 टक्के पाणी टक्केवारी व 123.23 टीएमसी एकूण पाणीसाठा केला जात होता व पाणी पातळी 497.730 मीटरपर्यंत ठेवलेली असते. परंतु 24 वर्षांत जे केले, ते यावर्षी केलेले नसून पाणी टक्केवारी 100 टक्के व एकूण पाणीसाठा 117 टीएमसी तर जिवंत पाणीसाठा 53 टीएमसीपर्यंत ठेवला आहे, म्हणजे यावर्षी 11 टक्के पाणी व सहा टीएमसी पाणीसाठा कमी केल्याचे दिसून येते आहे. या वस्तुस्थितीमुळे उजनीच्या कालव्यावरील एक आवर्तन कमी होणार, असे चित्र दिसत असून उन्हाळ्यामध्ये कालव्यातून पाणी मिळणार की नाही? याबद्दल आता शंका उपस्थित केली जात आहे. यामुळे लाभक्षेत्रातील लाखो एकर बागायती पिके संकटात सापडण्याची भीती व्यक्त होत आहे.
सन 1978 ते 2000 पर्यंत प्रत्येक वर्षी 100 टक्के पाणी व 117 टीएमसी पाणीसाठा केला जात असे. परंतु पुढे उजनी जलाशयावरून अनेक उपसा सिंचन योजना कार्यान्वित झाल्या, जलाशयातील बॅकवॉटर क्षेत्रातून 14 एमआयडीसी, सिनारमाससारखे मोठे उद्योगधंदे, तीन जिल्ह्यात 50 ते 54 साखर कारखाने, वीजनिर्मिती केंद्रे, खासगी व सार्वजनिक सिंचन योजना व शेतकऱ्यांच्या पाईपलाईन्समधून पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा होऊ लागला. या सर्व कारणांमुळे जलाशयातील पाणी कमी पडू लागले व म्हणून 2001 पासून पाणीसाठ्याची सव्वा मीटरने उंची वाढवण्यात आली व त्यामुळे मागील सलग 24 वर्षे ऑक्टोबरअखेर प्रत्येक वर्षी 487.630 मीटर पाणी पातळी, पाणी टक्केवारी 111 टक्के, एकूण 123 टीएमसी पाणीसाठा व यातील 60 टीएमसी जिवंत पाणीसाठा व 63 टीएमसी मृत पाणीसाठा असे धोरण राबवण्यात आले आहे.
ज्यावर्षी पावसाळ्यात पाऊस कमी झाला, त्यावर्षी पाणी साठवण क्षमता कमी झाली, पण हे अपवादात्मक घडले होते. यावर्षी 25 च्या पावसाळ्यात मे महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत सलग पाच महिने पाऊस होत आहे, उजनी धरणातून भीमा नदीत सहा वेळा हजारो क्युसेक पाणी सोडण्यात आल्यामुळे सहावेळा महापूर आला आहे. आतापर्यंत 213 टीएमसी पाणी धरणातून भीमा नदीत सोडून देण्यात आले आहे, ही वस्तुस्थिती आहे.
उजनीच्या 135 किलोमीटरपर्यंत डावा कालवा व 126 किलोमीटर उजवा कालवामधून सात ते आठ लाख एकर लाभक्षेत्राला पाणीपुरवठा केला जातो. 491 मीटर उंचीपर्यंत जिवंत पाणीसाठा असतो व त्याखाली मृत पाणीसाठा गृहित धरला जातो. उजनी कालव्याच्या दरवाज्याची तळपातळी(एम. डी. डी. एल. लेवल) 487.320 मीटरपर्यंत खाली आहे. जिवंत 491 मीटरपर्यंत व मृतसाठ्यातील चार मीटर म्हणजे 487 मीटर म्हणजे जवळजवळ दहा मीटर उंचीपर्यंत पाणी कालव्यातून सोडण्यात येते व लाखो एकर लाभक्षेत्राला रब्बी हंगामात 42 दिवसाचे एक आवर्तन आणि उन्हाळी हंगामात प्रत्येकी 45 दिवसांची दोन आवर्तने देऊन शेतीसाठी लाखो एकर क्षेत्रासाठी पाणी पुरवण्याचा प्रयत्न केला जातो.
प्रत्येक आवर्तनामध्ये सहा ते सात टीएमसी पाणी याप्रमाणे एकूण 18 ते 21 टीएमसी पाणी कालव्यातून शेतीसाठी दिले जाते. सोलापूर, पंढरपूर शहरासाठी प्रत्येक वर्षी भीमा नदीतून चार वेळा प्रत्येकी पाच ते सहा टीएमसीप्रमाणे एकूण 20 ते 22 टीएमसी पाणी पिण्यासाठी व बंधारे भरून घेण्यासाठी म्हणून सोडण्यात येते, ही वस्तुस्थिती आता गृहित धरली तरी 2025- 2026 या आगामी रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी धरणातून कालव्याखालील लाखो एकर लाभक्षेत्राला ऐन उन्हाळ्यात 42 ते 45 दिवसाचे एक आवर्तन पाणी कमी पडणार, हे निश्चित आहे.