

सोलापूर : सध्या उन्हाची तीव्रता वाढली आहे. अशा परिस्थितीत भीमा नदी कोरडी पडली होती. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. भीमा नदीकाठच्या अनेक गावच्या पाणीपुरवठा योजना अडचणीत आल्या होत्या. त्यामुळे पंढरपूर, सांगोला, मंगळवेढ्यासह दक्षिण सोलापूर तालुक्यातील पाणीप्रश्न ऐरणीवर होता.
त्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून परवानगी घेतली आहे. त्यामुळे गुरुवारी रात्री नऊ वाजलेपासून भीमा नदीत पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अनेक गावच्या पाणीपुरवठा योजना शेवटच्या घटका मोजत होत्या, त्यामुळे उजनीतून भीमा नदीत पाणी सोडावे अशी मागणी शेतकरी संघटना, आमदार, खासदारांनी सातत्याने केली होती.
जलसंपदा विभागाचा प्रस्ताव आणि गोरेंचा आग्रह
यंदा उन्हाची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे अल निनोचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत शासनाच्या सक्त सूचना होत्या. त्यामुळे जिल्ह्यातील जलसंपदा अधिकाऱ्यांनी तातडीने प्रस्ताव शासनाला सादर केला होता. तर तो मंजूर व्हावा यासाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सातत्याने पाठपुरावा करून सर्वांची परवानगी मिळवली आहे. त्यामुळे उजनीतून आता भीमा नदीत पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे.