

सोलापूर : सोलापूर, अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यांसाठी वरदायिनी ठरलेल्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस नसला तरी पुणे जिल्ह्यातील पावसामुळे काही अंशी दिलासा मिळाला आहे. रविवारी, दि. ५ जुलै रोजी दौंडमधून उजनी धरणात ६,८८३ क्युसेक पाण्याचा विगर्स सुरू होता. सोलापूर जिल्ह्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याची भिस्त या धरणावर आहे.
गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. ढग दाटून येतात; परंतु केवळ हलका पाऊस पडतो. त्यामुळे सोलापूरकरांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात पाऊस कमी असला तरीही भीमा खोऱ्यात काही ठिकाणी चांगला पाऊस सुरू आहे. लोणावळ्याचा भुशी डॅम ओसंडून वाहू लागला आहे. खडकवासला, पानशेत, टेमघर या धरणांतील पाणीसाठा वाढू लागला आहे.
घाटमाथ्यावर चांगला पाऊस सुरू असल्यामुळे रविवारी सकाळी आकडेवारीनुसार उजनी धरणात दौंड मधून ६ हजार८८३ क्युसेक पाणी येऊ लागले आहे. शनिवारी सकाळी सहा वाजता २८.११ एवढी उणे पातळी असलेल्या उजनी धरणातील पाणी पातळी रविवारी सकाळी मायनस २७.९६% एवढी झाली. पाण्याची आणखी आवक वाढण्याची शक्यता आहे. १२३ टीएमसी साठवण क्षमता असलेल्या उजनी धरणात सध्या ४८ टीएमसी एवढा पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे उजनी धरण शंभर टक्के कधी भरेल, याकडे लक्ष लागून राहिले आहे.