

सोलापूर : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उजनी धरणासह जिल्ह्यातील सर्व जलप्रकल्पांचे पाणी वर्षभर फक्त पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जाहीर केला. १५ ऑक्टोबरपर्यंत खरीप हंगामासाठी उजनी धरणातून सिंचनाचे रोटेशन सुरू राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सोमवारी दुपारी नियोजन समिती सभागृहात टंचाई परिस्थितीच्या आढावा बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यात यंदा ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे सुमारे ८५ टक्के खरीप पिकांचे नुकसान झाले. पुढील पंधरा दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास आणखी नुकसान होईल. ५ ऑक्टोबरनंतर परिस्थिती पाहून दुष्काळ जाहीर करण्याबाबत निर्णय होईल, अशी माहिती पालकमंत्री गोरे यांनी दिली.
पालकमंत्री म्हणाले...
पुढील वर्षभर जिल्ह्यात पिण्याचे पाणी उपलब्ध राहील, अशा पद्धतीने पाण्याचे नियोजन करावे
टंचाईग्रस्त गावातून टँकरची मागणी आल्यास त्या प्रस्तावाला ४८ तासांच्या आत मंजुरी दिली जाईल
टँकरची मागणी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन नियोजन करा
चारा पिकांच्या पेरणीसाठी तीन कोटींचा निधी उपलब्ध केला, पशुसंवर्धन विभागाने चाऱ्याचे नियोजन करावे