

सोलापूर : महायुतीत भाजपचा पालकमंत्री असल्याने निधी मिळत नसल्याची तक्रार शिवसैनिकांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली. पालकमंत्र्यांनी महायुतीत समन्वयाने काम न केल्यास कटुता वाढेल, असा इशारा सामंत यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना दिला आहे.
शिंदे शिवसेना पक्ष वाढविण्याच्या दृष्टिकोनातून मंत्री सामंत दोन दिवसांपासून सोलापूर दौऱ्यावर आहेत. गुरुवारी (दि.28) त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पालकमंत्र्यांना इशारा दिला आहे. यावेळी खा. ज्योती वाघमारे उपस्थित होत्या.
मंत्री सामंत म्हणाले, पालकमंत्री कोणाचा जरी असला तरी त्यांनी शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी पक्षातील नेते, पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन काम करणे गरजेचे आहे. शिंदे शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची कामे होत नसेल तर महायुतीत कटुता येईल, त्यास पालकमंत्री जयकुमार गोरे जबाबदार असतील, असा इशारा दिला आहे.
जरांगे यांच्यावर आंदोलनाची वेळ येणार नाही
एका महिन्यापूर्वी मनोज जरांगे यांच्याशी भेट झाली होती. त्यानंतर प्रसाद लाड त्यांना भेटायला गेले. मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्यापासून आहे. जरांगे यांच्या ज्या शंका असतील त्या महायुती सरकार दूर करेल. त्यामुळे जरांगे यांच्यावर आंदोलनाची वेळ येणार नाही, असे सरकार काम करणार असल्याची मंत्री सामंत यांनी सांगितले.