दूध भेसळीचा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

अत्यंत घातक मेलामाईन पंढरपूर तालुक्यातील सुगाव-भोसे येथे खुलेआम दाखल
Two lakh worth of milk adulterated goods seized
दत्तात्रय जाधवPudhari File Photo
Published on
Updated on

भोसे (क.) : पंढरपूर तालुक्यातील सुगाव, भोसे येथे अन्न आणि औषध प्रशासनाने छापा टाकला. यात दूध भेसळीसाठी वापरण्यात येणारा सुमारे दोन लाख रुपयांचा मोठा साठा जप्त केला. याप्रकरणी आरोपी दत्तात्रय महादेव जाधव, सचिन फाळके, अनिकेत कोरके या तिघांवर करकंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, भारतात बंदी असलेले आणि शरीराला अत्यंत अपायकारक असलेले मेलामाईन हे दूध भेसळीसाठी वापरले जाते. या केमिकलशी साधर्म्य असलेले एक पांढरे केमिकल द्रव अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांना पंढरपूर तालुक्यात सापडल्यामुळे दूध केंद्र चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी रात्री साडेबाराच्या सुमारास सोलापूर येथील अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी आणि करकंब पोलिस ठाण्याच्या पथकाने सुगाव भोसे येथे एका घरावर छापा मारला. यावेळी घटनास्थळी 13 लिटर दूध, (किंमत रु. 390), स्किम्ड मिल्क पावडर (अपमिश्रक) 28 पोती (699 किलो, किंमत रुपये 61 हजार 512), व्हेपरमिट पावडर (अपमिश्रक) (62 किलो, किंमत रुपये 5,368), रिफाईण्ड पामोलिन तेल (अपमिश्रक) (124.1 किलो, किंमत रुपये 23,506), अज्ञात पांढरे केमिकल द्रव (अपमिश्रक) (23 लिटर, किंमत रुपये 4,600), होल मिल्क पावडर (560.5 किलो, किंमत रुपये 98,648) असा एकत्रित एक लाख 94 हजार 24 रुपये किंमतीचा दूध भेसळीसाठी लागणारा कच्चा माल जवळ बाळगून दुधात भेसळ करताना आढळून आले आहे. संगनमताने मानवी शरीरास हानिकारक असलेल्या कृत्रिम दुध या अन्न पदार्थाचे उत्पादन करून पेढीमार्फत विक्री, वितरण करण्याचे उद्देशाने ठेवलेला आढळून आला आहे.

दरम्यान, पोलिस व अन्न आणि औषध प्रशासनाचा छापा पडल्याची माहिती कळताच दत्तात्रय जाधव हा पसार झाला. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी उमेश भुसे यांनी करकंब पोलीस ठाण्यात आरोपी दत्तात्रय महादेव जाधव, सचिन अरुण फाळके, अनिकेत बबन कोरके (सर्व रा. सुगाव भोसे) यांच्याविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदाकलम अन्वये करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई करताना सोलापूर येथील अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी सुनील जिंतूर, मंगेश लवटे, करकंब पोलीस ठाण्याचे सपोनी सागर कुंजीर यांनी सहभाग घेतला होता.

भेसळ करताना पकडायची चौथी वेळ

आरोपी दत्तात्रय जाधव हा खूप वर्षांपासून दुधात भेसळ करत आलेला आहे. भेसळ करताना पकडण्याची त्याची ही चौथी वेळ आहे. विशेष म्हणजे यापूर्वी चार वेळा भेसळ करताना पकडूनही जाधव हा एका केसमधून निर्दोष सुटला आहे. दोन प्रकरणांत न्यायालयात सुनावणी सुरू आहे. याबाबत (कै.) आ. भारत भालके यांनी सुगाव येथे होणार्‍या दूध भेसळीबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी भारतात बंदी असलेले मेलामाईंन हे केमिकल मोठ्या प्रमाणात आढळून आले होते. एवढे सारे होऊनसुद्धा भोसे परिसरात दूध भेसळीचे प्रकार सुरूच होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news