

सोलापूर : गुरुनानक चौक येथे खडी वाहतूक करणार्या डंपरने दुचाकीला धडक दिली. यात साक्षी मुन्ना कलबुर्गी (वय 7, रा. कुर्बान हुसेन नगर) हिचा दुर्दैवी मृत्यू झाला; तर दुचाकीवरून केगाव येथून सोलापूरकडे येणार्या तरुणास कंटेनरने धडक दिल्याने त्याचाही मृत्यू झाला.
अधिक माहिती अशी की, शुक्रवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास ट्युशन संपवून आईबरोबर दुचाकी (एमएच 13 सीजी 9984)वरून साक्षी घराकडे निघाली. मात्र पाठीमागून आलेल्या डंपर (एमएच 13 एसी 9388) ने कट मारल्याने साक्षी डंपरखाली आली. यावेळी डंपर चालकाने गाडी न थांबवता पुढे नेली. साक्षीच्या डोक्यावरून डंपरचे चाक गेल्याने ती गंभीर जखमी झाली. उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार सुरु असताना मृत्यू झाला.
दुसर्या घटनेत एमआयटी कॉलेजजवळ केगांव येथून सोलापूरकडे दुचाकीवरून येणार्या दुचाकी चालकास पाठीमागून आलेल्या अज्ञात कंटेनरने धडक दिली. त्यात तरुणाचा मृत्यू झाला. त्याला जखमी व बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्या तरुणाची ओळख पटली नाही.
अपघात झाल्याचे कळताच गुरुनानक चौक परिसरात नागरिकांची गर्दी झाली. यावेळी डंपर चालक तेथून पसार झाल्याने जमावाचा उद्रेक वाढला. जमावाने डंपरची कागदपत्रे व वाहतूक परवाना संपलेला असल्याचा आरोप करीत डंपर ताब्यात घेण्याची मागणी पोलिसांकडे केली.
शहरात खडी वाहतूक करणार्या डंपरने धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी नियम धाब्यावर बसून राजरोसपणे वाहतूक सुरू आहे. मागील काही महिन्यांपूर्वीही डंपरच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू झाला होता. यातून वाहतूक पोलिसांनी कोणताही धडा न घेतल्याने पुन्हा साक्षीला आपला जीव गमवावा लागला आहे. शहरातून बेदरकारपणे व बेकायदेशीरपणे खडी वाहतूक करणार्या वाहनांना बंदी घालावी. अशा वाहतुकीवर प्रशासनाने वेळीच कारवाई केली असती तर हा अपघात घडला नसता. प्रशासनाने आता तरी याला आवर घालावा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरणार असा इशारा आक्रमक जमावाने दिला आहे.
वाहतूक पोलिसांच्या कारणाम्यामुळे जमाव संतप्त झाला. वाहतूक पोलिस केवळ वसुली करतात. मात्र वाहतुकीला कोणतीही शिस्त लावत नाहीत, असा आरोप नागरिकांनी केला. वाहतूक पोलिसांची कर्तव्य काय आणि कर्तव्यात कसूर करणार्या पोलिसांवर कारवाई करणार काय, असा सवाल जमावाने उपस्थित केला आहे. जमावाचे रौद्ररूप पाहून संबंधित दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन सदर बझार पोलिसांनी दिले.