

सोलापूर : शहरातील एका चार्टड अकाउंटंटना शेअर मार्केटमध्ये जादा परताव्याचे आमिष दाखवून तब्बल दोन कोटी 28 लाख रुपयांना फसवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या सीएनी आठ वेगवेगळ्या खात्यामध्ये हे पैसे ट्रान्स्फर केले होते. त्यातील तीन अकाउंटची माहिती सायबर पोलिसांना मिळाली आहे.
शहरातील नामवंत श्रीगोंदे नामक सीएना अनोळखी क्रमांकावरुन लिंक पाठविण्यात आली. व्हॉट्सॲप ग्रुपवर जॉईन करुन त्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परताव्याचे आमिष दाखवले. त्यांनी प्रथम एक लाख रूपये गुंतवले त्यातून त्यांना 25 हजार रूपये परतावा मिळाला. त्यानंतर त्यांनी आठ अकाउंटमध्ये तब्बल दोन कोटी 28 लाख रूपये पाठवले. त्यानंतर त्यांना ऑनलाईन 34 कोटी रूपयांचा नफा झाल्याचे दाखविण्यात आले. हे पैसे मिळण्यासाठी इन्कम टॅक्स भरण्यासाठी अजून पैशाची मागणी केली. श्रीगोंदे स्वतः सीए असल्याने त्यांना इन्कम टॅक्स कसा भरतात याची माहिती होती.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीशैल गजा यांनी तपासास सुरूवात केली. आठ अकाउंटपैकी पुणे, अकोला आणि राजस्थान येथील बँक अकाउंटची माहिती मिळविली. उरलेल्या बँक अकाउंटची माहिती घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सीए असलेल्या व्यक्तीची एवढ्या मोठ्या रकमेची फसवणूक झाल्याने सोलापुरात खळबळ उडाली आहे.