

सोलापूर : गांजी विक्रीसाठी आलेल्या ओडीशा येथील दोन इसमांना सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या गुन्हे शाखेने सोलापूर-कोल्हापूर महामार्गावर कोरवली ब्रिजजवळ अटक केली. 17 किलो गांजासह पावणेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर यांना खबर मिळाली की, कोरवली येथील ब्रिजजवळ दोन इसम गांजा विक्रीसाठी येणार आहेत. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी टीम तयार केली. 30 ऑगस्ट रोजी कोरवली येथे जाणार्या ब्रिजजवळ सापळा रचला. बॅग घेऊन येणार्या सूरज प्रदीप नायक (वय 21) आणि विग्यानंद बालतेनो नायक (21) (दोघे रा. भालीपंका, ता. गुलाबा, जि. गजपती, ओडीशा) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यांच्याकडील बॅगेत गांजा आढळून आला. दोघांना अटक केली आहे.
एकूण 17 किलो 567 ग्रॅम गांजा, दोन मोबाईल असा एकूण तीन लाख 73 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्यावर कामती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाने त्यांना चार सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सहायक पोलिस निरीक्षक भीमगोंडा पाटील, सहायक फौजदार नीलकंठ जाधवर, सलीम बागवान, हरिदास पांढरे, विजयकुमार भरले, अनिस शेख, जयवंत सादुल, अश्विनी गोटे, सागर डोरे-पाटील, प्रमोद शिपाळ आदींचा तपास पथकात समावेश होता.