

तुळजापूर : श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला रविवारी (दि. ११ ऑक्टोबर) दुपारी १२ वाजता घटस्थापनेने प्रारंभ होत आहे. तत्पूर्वी भाद्रपद कृष्ण पक्ष अष्टमीला सायंकाळी सुरू झालेली मातेची मंचकी निद्रा आश्विन शुद्ध प्रतिपदेला रविवारी पहाटे संपणार आहे.
आठ निद्रा पूर्ण करून नवव्या दिवशी मातेची मुख्यमूर्ती सिंहासनाधिष्ठित होत आहे. मुख्य मूर्तीला दोनवेळा पंचामृत अभिषेक पार पडणार आहेत. दुपारी बारा वाजता मातेची शोड्षोपचार पूजा, नैवेद्य, धुपारती अंगारा पार पडल्यानंतर सिंह गाभाऱ्यात विधिवत घटस्थापना केली जाणार आहे. मंदिर मध्यरात्री एक वाजता उघडणार असून पहाटे निद्रिस्त मूर्तीला सिंहासनाधिष्ठित करण्यापूर्वी शेजघरातील पलंगावरच चरणतीर्थ पार पडेल. मंदिर संस्थान व देवीच्या मुख्य पुजाऱ्यांकरवी मानाच्या आरत्या पार पडल्यानंतर मूर्तीला जेजुरीतून आणलेला खंडेरायाचा भंडारा लावला जातो. या धार्मिक विधीनंतर निर्माल्य विसर्जन होऊन पूजेची घाट देऊन मुख्य मूर्ती चांदीच्या पलंगावरून हलवून सिंहासनाधिष्ठित करण्यात येत आहे.
मातेची मुख्य मूर्ती सिंहासनावर विराजमान झाल्यानंतर पुन्हा मुख्य पुजाऱ्यांकरवी मातेला आरत्या ओवाळून देवीची दृष्ट काढण्यात येते. त्यानंतर मूर्तीला पंचामृत अभिषेक सुरू होऊन सूर्योदयापूर्वी मातेची शोड्षोपचार पूजा, नैवेद्य, धुपारती, अंगारा पार पडणार आहे. त्यानंतर पुन्हा सकाळी सहा वाजता देवीच्या नित्य पूजेची घाट होऊन मूर्तीला दुसऱ्यांदा पंचामृत अभिषेक पार पडेल. मातेच्या मुख्य मूर्तीची आज त्रिकाल पूजा पार पडते. मातेला छत्रपतींच्या घराण्यांकडून अर्पण झालेल्या प्राचीन दागदागिन्यांचा साज चढविण्यात येत आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून भाविकांना घाटशीळ वाहनतळमार्गे बीडकर पायरीकडून दर्शन मंडपात सोडण्यात आले होते.
दुपारी १२ वाजता घटस्थापनेचा विधी रविवारी ११ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता आजच्या पूजेचे मानकरी भोपे पुजारी, सौ. व श्री. जिल्हाधिकारी डॉ. कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते मातेसमोरील सिंह गाभाऱ्यानजीक विधिवत घटस्थापना होणार आहे. त्यानंतर भवानीशंकरा समोरील घाटीखाली स्थानिक ब्रह्मवृंदांना नवरात्रौत्सवाच्या काळात अखंड वेद पठणासाठी वर्णी (सुपारी) देऊन आमंत्रित करण्यात येणार आहे. नऊ दिवस दररोज सायंकाळी मातेची छबिना मिरवणूक पार पडणार आहे. पाचव्या माळेपासून खंडेनवमीपर्यंत मातेच्या विविध अवतार महापूजा बांधण्यात येणार आहेत.
तुळजापुरात लाखो भाविकांची गर्दी
गेल्या दोन दिवसापासून महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यातील भाविकांनी तुळजापूरनगरीत लाखोंच्या संख्येने गर्दी केली आहे. तुळजापूर नगरीत प्रज्वलित केलेली भवानी ज्योत आपापल्या गावाकडे नेण्यासाठी युवकांच्या झुंडीच्या झुंडी दाखल होताना दिसून येत आहेत. रविवारपासून पौर्णिमेपर्यंत भाविकांना बीडकर पायरी मार्गे दर्शन मंडपात सोडण्यात येणार असून मातेचे दोन्ही महाद्वार मंदिर प्रवेशासाठी बंद करण्यात आले आहेत.