

तुळजापूर : मकर संक्रांतीच्या पर्वकाळात बुधवारी (दि. 14) महाराष्ट्राची कुलस्वामिनी तथा शक्तिदेवता श्री तुळजाभवानी मातेला हजारो सुवासिनींनी ओवासून आणि प्रार्थनापूर्वक साद घालत मातेकडे सौभाग्याचे दान मागितले. श्री तुळजा भवानी माता ही स्त्रीशक्तीचे साक्षात रूप आहे. याच भावनेतून हजारो सुवासिनी, महिला भाविकांनी आज मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
मातेच्या दरबारात संक्रांतीचा वाणवसा करणे परमभाग्य समजले जाते. मंगळवारनंतर जानेवारीच्या उत्तररात्री सूर्यनारायणाचा धनू राशीतून मकर राशीत प्रवेश, दक्षिणायन संपून उत्तरायणाचा संक्रमण काळ सुरू झाला. यंदाच्या मकर संक्रांतीचे वैशिष्ट्य म्हणजे श्री तुळजाभवानी मातेची मुख्य मूर्ती चांदीच्या सिंहासनावर आरूढ होती. मध्यरात्री एक वाजता मंदिर उघडल्यानंतर चरणतीर्थ पार पडले. सकाळी 6 वाजता मातेच्या नित्योपचार पूजेला प्रारंभ होऊन पंचामृत अभिषेकानंतर शोड्षोपचार पूजा पार पडली.
मातेला नित्य वस्त्रालंकाराचा साज चढवून नैवेद्य, धुपारती, ओला अंगारा काढण्यात आला. त्यानंतर मातेचे नित्य दर्शन सुरू झाले. संक्रांतीनिमित्त मातेच्या मुख, धर्म दर्शनासाठी महिलांसह भाविकांची मोठी गर्दी पाहावयास मिळाली. मकर संक्रांतीच्या निमित्ताने मंगळवारी व बुधवारी शहर व परिसरातील किमान 20 हजारावर महिलांनी मंदिरात वाणवसा करून संक्रांतीचा आवा लुटला. या काळात पुरुषांना एक तास मंदिर प्रवेश बंद करण्यात आला होता.
स्थानिक महिलांना आधार कार्ड दाखवून मंदिरात थेट प्रवेश दिला जात होता. बुधवारी कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मातेला रत्नजडीत सोन्या-चांदीच्या दाग-दागिन्यांसह साखरेच्या हलव्याचे दागिनेही परिधान करण्यात आले होते. या वेशात मातेचे साजिरे रूप आणखीनच उजळून दिसत होते.