

तुळजापूर : तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखाड्यांतर्गत श्री तुळजाभवानी देवी छत्रपती शिवाजी महाराजांना ‘भवानी तलवार’ प्रदान करत असतानाचे 108 फूट उंचीचे भव्य शिल्प उभारण्यात येणार आहे. या शिल्पास कला संचलनालयाची मान्यता मिळणार असून, त्याच्या निर्मितीस लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती मंदिर संस्थानचे विश्वस्त व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या प्रशासकीय कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार पाटील बोलत होते. यावेळी ते म्हणाले, हे शिल्प ऐतिहासिक दृष्टिकोन लक्षात घेऊन तयार केले जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील वेशभूषा, त्यांची शरीरयष्टी आणि त्या काळातील वातावरण यांचा अभ्यास करून इतिहासकार व तज्ज्ञांच्या सल्ल्याने कला संचलनालयाने शिल्पनिर्मितीचे निकष ठरविले आहेत.
या भव्य शिल्पासाठी इच्छुक शिल्पकारांनी अडीच ते तीन फूट उंचीच्या शिल्पाचा नमुना कला संचलनालयाकडे सादर करावा, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले. कला संचलनालय प्राप्त नमून्यांमधून पाच उत्कृष्ट नमुन्यांची निवड करणार असून, त्यातूनच अंतिम शिल्प निवडले जाणार आहे. शासनस्तरीय चर्चा आणि अंतिम निर्णय या शिल्पाच्या उभारणीसंदर्भात मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून मंदिर संस्थान अंतिम निर्णय घेणार असल्याचे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.
हे शिल्प श्री तुळजाभवानी देवी मंदिराच्या ऐतिहासिक वैभवात भर घालणार असून, भाविकांसाठी एक आकर्षण केंद्र ठरणार आहे. या उपक्रमामुळे तुळजापूरचे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व अधिक वृद्धिंगत होणार असून, यामुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे.