

तुळजापूर : ज्याप्रमाणे महाराष्ट्रात शिर्डी साईबाबा, शेगांवचे संतश्रेष्ठ गजानन महाराज, अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांचे प्रकट दिन साजरे होतात, त्याप्रमाणे तिर्थक्षेञ तुळजापूर नगरीत शनिवारी (दि. 5 एप्रिल) दुर्गाष्टमी दिनी श्री तुळजाभवानी मातेच्या प्रकट दिनानिमित्त मंदीरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करुन‘आई राजा उदो उदो’चा जयघोष करीत देवीचा उत्पत्ती दिन (प्रकट दिन) साजरा केला.
यादिवशी श्री तुळजाभवानी मातेस दहीदुध,पंचामृत अभिषेक घालण्यात येवून महंत तुकोजी बुवा (महाराज) यांच्या हस्ते विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मंदिरासमोर सामान्य देवी भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आला.या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक पुजारी बांधवानी परीश्रम घेतले.
आजच्या दिवशी प्रत्येक तुळजापूर वासियांना स्वतःच्या घरासह परिसराची साफसफाई,स्वच्छता करुन दारात रांगोळ्या काढून मुख्य दरवाजावर तोरणे उभारून देवीला गोडाधोडाचा नैवैद्य दाखविला.
स्कंद पुराणातील सह्याद्री खंडात श्री तुळजा भवानी मातेची अवतार कथा आहे. कृतयुगात कर्दम ऋषींच्या पत्नी अनुभूती तपस्येत असताना, कूकर या दैत्याने तिचे पावित्र्य भंग करण्याचा प्रयत्न केला. तपस्वी अनुभूतीने पावित्र्य रक्षणासाठी देवी भगवतीचा धावा केला. देवी भगवती साक्षात प्रगटली व कूकर या दैत्याशी युद्ध करून त्याचा वध केला. साध्वी अनुभूतीच्या विनवणीवरून देवी भगवतीने या पर्वतराईत वास्तव्य केले.भक्तांच्या हाकेला त्वरित धावून येणारी व मनोरथ पूर्ण करणारी म्हणून ही देवी त्वरिता-तुरजा-तुळजा(भवानी) या नावाने ओळखली जाते.संपूर्ण भारतात कुलदेवता म्हणून या देवीला मान आहे.