

करमाळा : भोंदूबाबा अशोक खरातला मदत करणाऱ्या टोळीला जेरबंद करून कठोर कारवाई केल्याशिवाय लैंगिक शोषण करणारे रॅकेट उद्ध्वस्त होणार नाही, असे मत भूमाता ब्रिगेडच्या संस्थापिका अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी व्यक्त केले.
करमाळा तालुक्यातील जेऊर येथे 21 जानेवारी रोजी अल्पवयीन विद्यार्थिनीच्या संशयास्पद आत्महत्या प्रकरणाच्या असमाधानकारक तपासाविषयी करमाळा तालुका नागरिक कृती समितीने प्रशासनाला निवेदन दिले. त्यासाठी देसाई करमाळ्यात आल्या होत्या.
भोंदू खरातला मदत करणारे या गुन्ह्यामध्ये भागीदार आहेत का? त्याला मदत करणाऱ्या टोळीला जेरबंद केलं पाहिजे, तरच खऱ्याअर्थाने ते रॅकेट उद्ध्वस्त होईल, असे सांगून देसाई म्हणाल्या, खरातच्या कृत्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी अंधश्रद्धेच्या आधारावर केलेल्या वक्तव्याचाही देसाई यांनी खरपूस समाचार घेतला. यावेळी ॲड सविता शिंदे, भावना गांधी, पद्मजा इंगवले, विजयमाला चवरे, विवेक येवले, उत्तरेश्वर कांबळे, नलिनी जाधव उपस्थित होते.
उंदरगावचे मनोहर याचीही चौकशी करा
उंदरगावचे मनोहर हे स्वतःला बाळूमामाचा अवतार समजतात. मग, त्यांना आश्रम का बंद करावा लागला? 2021-22 मध्ये मनोहरवर दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर त्याने जेलची हवा खाल्ली आहे. त्याला भेटायला मोठे पुढारी, अधिकारी येतात. ते जर खरोखर देव असते, तर गावोगावी फिरण्याची वेळ आली असती का? खरातप्रमाणेच मनोहरची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी तृप्ती देसाई यांनी यावेळी केली.