

आमसिद्ध व्हनकोरे
सोलापूर : आदिवासी समुदायातील 1521 विद्यार्थी व विद्यार्थिनी हे शासकीय शिक्षण शुल्कच्या मदतीतून आयुर्वेद, ॲलोपॅथिक, दंतशास्त्र आणि होमिओपॅथिकसह अन्य वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित शिक्षण घेत असून यासाठी शासनाच्या तिजोरीतून शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयाला लाखो रूपये खर्च होतात. शासनाच्या सहकार्याने दरवर्षी दीड हजाराहून अधिक तरूण वैद्यकीय शिक्षण घेऊन वैद्यकीय क्षेत्रात पदार्पण करतात.
राज्याच्या आदिवासी समुदायातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय व वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित शिक्षण घेता यावे, म्हणून या विभागाच्यावतीने या प्रवर्गातील वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील शिक्षणासाठी शिक्षण शुल्क प्राधिकरणाच्या माध्यमातून आर्थिक सहयोग देते. शहरनिहाय वैद्यकीय शिक्षण देत असलेल्या संस्थेवरून शिक्षण शुल्कची रक्कम संस्थेला वितरीत केली जाते.
मुंबई, पुणे, नागपूर व छत्रपती संभाजी नगर यासारख्या मल्टीसिटीतील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसह शिक्षण शुल्कही अधिक दिली जाते. ही रक्कम शिष्यवृत्तीशिवाय संस्थेला दिली जाते. या माध्यमातून आर्थिक स्थिती नसलेल्या या आदिवासी क्षेत्रातील अभ्यासू विद्यार्थ्यांची डॉक्टर होण्याची इच्छा सहज पूर्ण करता येणार आहे. शिवाय, प्रत्येक अभ्यासक्रमनिहाय शिक्षण शुल्कची रक्कम शासनस्तरावरून ठरविण्यात आली आहे. यात एमबीबीएस व बीडीएस या अभ्यासक्रमाला जास्त तर आयुर्वेद आणि होमिओपॅथिकला कमी रक्कम वितरीत केली जाते. शासनाकडून शिक्षण शुल्कच्या माध्यमातून लाखाच्या घरात रक्कम दिली जात असल्याने आदिवासी विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण घेणे सोपे झाले आहे.
शासनाकडून केला जाणाऱ्या लाखो रूपयांच्या खर्चामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना नीटसारख्या परिक्षेत मिळालेल्या गुणांवरून कोणत्याही प्रकारचे खर्च न करताही डॉक्टर होता येणार आहे. यंदा 2521 विद्यार्थ्यांना भविष्यात वैद्यकीय क्षेत्रात उतरून सेवा देता येणार आहे.