

सोलापूर : प्रेमप्रकरणातून एका तृतीयपंथीयाने जीवन संपवल्याची घटना गुरुवारी (दि. 4) सोलापुरात घडली. प्रकाश व्यंकप्पा कोळी ऊर्फ स्विटी (वय 22, रा. साईनगर, बाळे, सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या तृतीयपंथीयाचे नाव आहे. तत्पूर्वी त्याने व्हिडीओ काढून भावना व्यक्त केल्या. याप्रकरणी प्रियकर सुजित अप्पासाहेब जमादार याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
प्रकाश कोळी ऊर्फ स्विटी हा गुरुवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी पत्र्याच्या लोखंडी अँगलला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला नातेवाईकांनी खाली उतरवून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारापूर्वी तो मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. प्रेमप्रकरणातून त्याने आत्महत्या केल्याची नोंद सिव्हील चौकीत आहे. त्याच्या आत्महत्येची माहिती मिळताच नातेवाईक तसेच तृतीयपंथीयांनी शासकीय रुग्णालयात गर्दी केली.
सुजित जमादार याने माझ्याशी खोटे प्रेम केले, लग्न केले, आता तो दुसरे लग्न करीत आहे. माझ्या आत्महत्येला केवळ सुजीत जमादार कारणीभूत असल्याचे प्रकाश याने व्हिडीओव्दारे सांगितले. दरम्यान प्रकाश याचा भाऊ नागेश कोळी याच्या फिर्यादीवरुन प्रकाश याला आत्महत्येचा प्रवृत्त केल्याप्रकरणी सुजीत जमादार याच्या विरोधात फौजदार चावडी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.
सुजीतवर कठोर कारवाईची मागणी
या प्रकरणात सुजीत जमादार याला कठोर शिक्षा करण्याची मागणी प्रकाश याची बहिण ज्योती कोळी आणि तृतीयपंथींनी केली. सुजीत याने प्रेमाचे नाटक करुन त्याला लुबाडले. बाळे येथे घर करुन ठेवले. तो प्रकाशला कुणालाही भेटू देत नव्हता. मारहाण करीत होता. तो दुसरे लग्न करीत असल्याचे समजल्यानेच प्रकाशने आत्महत्या केल्याचा आरोप त्यांनी केला.
गळफास घेण्याअगोदर काढला व्हिडीओ
प्रकाश कोळी याने गळफास घेण्याच्या काही मिनीटाअगोदर व्हिडीओ काढून तो नातेवाईक तसेच मित्रांना पाठवला आहे. यात तीन वेगवेगळे व्हिडीओ आहेत. यामध्ये प्रकाश याने सुजीत जमादार याच्यावर आरोप केले आहेत. मी हे पाऊल उचलत आहे याचा जिम्मेदार फक्त सुजीत जमादार हा आहे. माझ्याशी लग्न केला खोटं प्रेम केला आठ वर्षे राहिला. माझ्याशी लग्न करुन मला इथं घर करुन ठेवला. मला कुठे जाऊ देत नव्हता येऊ देत नव्हता. माझे सगळे माणसं तोडला, माझ्या जोगती समाजापासून मला लांब ठेवला. आता तो दुसरं लग्न करतोय. माझे हे व्हायला फक्त तोच जबाबदार आहे. मी कुणाचे एक रुपये देणे नाही. मी गेल्यानंतर माझ्या घरच्यांना कोणी त्रास देऊ नका असे प्रकाश याने व्हिडीओत म्हंटले आहे.