

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील तीन हजार 737 शिक्षकांच्या ऑनलाईन जिल्हांतर्गत बदल्या झाल्या आहेत. तर अद्यापही 700 शिक्षक बदलीसाठी वेटिंगरवर आहेत.
संवर्ग एक, संवर्ग दोन आणि एका शाळेत पाच किंवा दहा वर्षापेक्षा जास्त सेवा दिलेले चार हजार 438 शिक्षक बदलीसाठी पात्र होते. त्यातील तीन हजार 737 शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. तर उर्वरित शिक्षकांचे बदली प्रक्रियेकडे लक्ष लागले आहे. संवर्ग एकमधून 654, संवर्ग दोन मधून 202, दहा वर्षे पूर्ण झालेले दोन हजार 881 शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. तर अद्यापही सातशे शिक्षक बदलीस पात्र असून, विविध त्रुटीमुळे त्यांच्या बदल्या थांबल्या असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
दरम्यान, बदली झालेले शिक्षक प्राथमिक शिक्षण विभागाकडे कार्यमुक्तीचे आदेश मिळावेत, यासाठी फेर्या मारत आहेत. मात्र, बदलीतील तांत्रिक अडचणी मुळे अनेक शाळेत शिक्षक अतिरिक्त झाले आहेत. तर काही शाळेत एकही शिक्षक शिल्लक राहत नाहीत. त्यामुळे शिक्षण विभागाने बदली झालेल्या शिक्षकांना अद्यापही कार्यमुक्त केले नाही. मात्र, शिक्षक संघटनाकडून कार्यमुक्तीचा आदेश मिळावा, यासाठी दबावगट निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु, ग्रामविकास विभागाच्या आदेशा-शिवाय बदल्या झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करणार नाही, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात येत आहे.
अनेक शाळेत शिक्षकांच्या जागा रिक्त
जिल्ह्यातील बर्याच शाळेत शिक्षक असताना त्या ठिकाणी जिल्हांर्तगत बदलीतून शिक्षक देण्यात आले. काही शाळेत शिक्षकांची जागा रिक्त असताना त्या ठिकाणी बदलीतून शिक्षक मिळाले नाही. त्यामुळे अनेक शाळेत शिक्षकांच्या शेकडो जागा रिक्त असल्याचे दिसत आहेत.