

सोलापूर : जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १ लाख २४ हजारांहून अधिक टेलिकॉम संसाधनांवर कारवाई करण्यात आली. पहिल्यांदा नियम मोडणारे १ लाख १० हजार ३२५ नंबर १५ दिवसांसाठी, तर वारंवार नियमभंग करणारे १३ हजार ७७७ नंबर वर्षभरासाठी बंद करण्यात आले आहेत.
बँकिंग, विमा, क्रेडिट कार्ड, कर्ज आणि विविध उत्पादनांच्या जाहिरातींच्या नावाखाली येणारे अनावश्यक फोन आणि संदेश मोबाईलधारकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. देशातील तब्बल १३४ कोटी ९० लाख मोबाईल ग्राहकांना या स्पॅम कॉल्सचा त्रास होऊ नये, यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) कारवाईचा बडगा उगारला आहे.
स्पॅम संदेश पाठविणाऱ्या ३७४ कंपन्यांनाही वर्षभरासाठी ब्लॅकलिस्ट करण्यात आले आहे. ट्रायच्या तिमाही अहवालानुसार, ग्राहकांकडून व्यावसायिक कॉल्स आणि संदेशांविरोधात १५.२९ लाख तक्रारी नोंदविण्यात आल्या.
डीएनडी नोंदणी करणारे ग्राहक किती?
देशातील १३४.९ कोटी मोबाईल ग्राहकांपैकी २२.४४९ कोटी ग्राहकांनी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत डीएनडी (डू नॉट डिस्टर्ब) सेवेत नोंदणी केली आहे. हे प्रमाण केवळ १६.६४ टक्के आहे. तब्बल ११२ कोटींहून अधिक ग्राहकांनी अद्याप डीएनडी पसंती नोंदविलेली नाही. या तिमाहीत ट्रायच्या डीएनडी ॲपवर १४.२१ लाख तक्रारी प्राप्त झाल्या. एकूण तक्रारींपैकी ९२.९ टक्के तक्रारी ॲपच्या माध्यमातून आल्या. ३० सप्टेंबरपर्यंत या ॲपचे ४२.३६ लाख डाउनलोड झाले होते.
व्यावसायिक कॉल्ससाठी स्वतंत्र नंबर मालिका
ग्राहकांना कॉलचा प्रकार ओळखता यावा, यासाठी ट्रायने स्वतंत्र नंबर मालिका निश्चित केल्या आहेत. १४० मालिका प्रमोशनल कॉल्ससाठी, १६०० मालिका बँकिंग, वित्तीय सेवा, विमा आणि सरकारी व्यवहारांसाठी, तर १० ऑगस्ट २०२६ पासून १६०१ मालिका युटिलिटी, लॉजिस्टिक्स आणि डिलिव्हरी सेवांसाठी सुरू केली आहे. या तिमाहीत १४० मालिकेतून १५.२७ अब्ज प्रमोशनल कॉल्स करण्यात आले.