सोलापूर ः जिल्ह्यातील पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक डेटा शासनाकडून डिजिटल स्वरुपात संकलित करण्यात येत आहे. आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यात सहा लाख 46 हजार 220 विद्यार्थ्यांचे अपार आयडी नोंदणी पूर्ण झाली आहे. मात्र, शेवटच्या टप्प्यात अपार आयडी नोंदणीची प्रक्रिया मंदावल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे.
अपार आयडी नोंदणी पूर्ण करण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने 31 डिसेंबरपर्यंतची वेळ दिली होती. मात्र, बर्याच शाळांनी नोंदणीसाठी विलंब लावल्याने तसेच अनेक अडचणी येत असल्याने अपार आयडी नोंदणीची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात संथगतीने होत आहे. त्यामुळे अपार आयडीचे काम वेळेत पूर्ण न करणार्या शाळांवर शिक्षण विभागाकडून कारवाई करण्याची गरज आहे. जिल्ह्यात एकूण चार हजार 710 शाळा आहेत. त्यातील सात लाख 93 हजार 142 विद्यार्थी आहेत. त्यातील सहा लाख 46 हजार 220 विद्यार्थ्यांचे अपार आयडी काढण्यात आले आहे. तर उर्वरित आयडी पूर्ण करण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाकडून सातत्याने बैठका घेण्यात येत आहेत. मात्र, याकडे शाळांकडून कानाडोळा करत असल्याने उर्वरित अपार आयडी नोंदणीसाठी विलंब लागत आहे. अपार आयडीमुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक डाटा एका क्क्लिकवर उपलब्ध होत असल्याने भविष्यात शासनास याचा फायदा होणार आहे.
मोहोळ - 43750, माळशिरस - 69154, अक्कलकोट - 44315, सांगोला - 52560, उत्तर सोलापूर - 49633, मंगळवेढा - 33085, माढा - 48821, पंढरपूर - 67101, करमाळा - 30275, दक्षिण सोलापूर - 38204, बार्शी - 48338, सोलापूर सिटी - 120984 अशी एकूण सहा लाख 46 हजार 220 विद्यार्थ्यांची अपार नोंदणी झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील बर्याच शाळांकडून अपार आयडी काढण्याचे काम कासवगतीने होत आहे. अपार आयडी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. अशा शाळांना प्राथमिक शिक्षण विभागाकडून वारंवार सूचना देऊन आयडी काढण्याचे काम पूर्ण करुन घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ज्या शाळा अपार आयडी कार्ड वेळेत काढणार नाहीत, अशा शाळांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने दिली.