

सोलापूर : सोलापुरी ही एक मधाळ स्वरूपाची रांगडी भाषा आहे. या भाषेतील साहित्यिकांचे 17 व्या शतकापासून मराठी साहित्यामध्ये योगदान असल्याचे मत सोलापुरातील मराठी अभ्यासकांनी व्यक्त केले.
कविराय राम जोशी यांच्यापासून कवी कुंजविहारी, कवी रा. ना. पवार, कवी चंद्रभूषण कुलश्रेष्ठ, कवी द. ता. हलसगीकर, कवी मारुती कटकधोंड, माधव पवार, अंजली कुलकर्णी, डॉ. सुवर्णा गुंड अशा नव्या-जुन्या कवींनी अतिशय वेगवेगळ्या धारणीच्या कविता दिल्या आहेत. गजलांच्याबाबत सोलापुरातील साहित्यिक अग्रेसर आहेत. बदीउज्जमा बिराजदार, प्रा. मनोहर जोशी यांच्या गजला चित्ताकर्ष स्वरुपाच्या आहेत. कादंबरीच्याबाबत अतिशय भरीव स्वरूप प्रा. त्र्यं. वि. सरदेशमुख यांनी दिले आहे. डागोंटा एका नगरीचा या कांदबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. 1900 व्या शतकाच्या सुरुवातीला धनुर्धरसारखी कादंबरी सोलापुरात निर्माण झाली. लक्ष्मीनारायण बोल्ली यांनी काव्य आणि चरित्र कादंबरी हे दोन्ही प्रकार सक्षमपणे हाताळले. प्रा. द. ता. भोसले यांनी कथा, कादंबरी आणि समिक्षा तितक्याच क्षमतेने हाताळले. राजेंद्र भोसले, प्रकाश गव्हाणे यांच्याही कथा उल्लेखनीय आहेत.
लघुकथेच्या बाबतीमध्ये या सर्व लेखकांच्या कथा महत्त्वाच्या आहेत. श्रीकांत मोरे यांच्या अल्प अक्षरातील कथा हिंदू-मुस्लिम ऐक्य, पर्यावरणावर आहेत. डॉ. अर्जुन व्हटकर यांच्या कथा म्हणजे मराठी साहित्यांमध्ये एक नवा वाण. मुक्या जंगलाचे गर्जनामधून व्हटकर यांनी पशू, पक्षी यांचा शोध, रूढी, परंपरा आणि मिथकच्या अनुषंगाने महत्त्वाचे काम केले आहे.
मराठी साहित्यांमध्ये सोलापुरातील मारुती चित्तमपल्ली यांच्यासह सुरेखा शहा, इंद्रजित घुले, दत्ता गायकवाड, प्रा. चंद्रकांत चव्हाण, प्रा. कृष्णा इंगळे, प्रा. रणधीर शिंदे, सुहास पुजारी, रमेश शिंदे, प्रा. शिवाजी शिंदे यांच्यासह अनेक लेखकांचे मोठे योगदान आहे.
सोलापुरी ही एक मधाळ स्वरुपातील रांगडी भाषा आहे. या भाषेत काव्यशास्त्र, विनोद रंगलेला आहे. मराठीने कन्नड वचनाचा आणि कन्नड साहित्याचा अनुवाद करुन घेऊन सोलापूर भाषेचे मुख्यदर्शन केले आहे. कन्नड मिश्रित सोलापुरी भाषा असल्याने कन्नड भाषेतील अनेक शब्द मराठी भाषेत रूढ झाले आहेत.