

सोलापूर : जिल्ह्यात 211 विद्यार्थी दिव्यांग आहेत. त्या विद्यार्थ्यांना मोठ्या अक्षराची पाठ्यपुस्तके वितरण केली जाणार आहेत. पाठ्यपुस्तकांचे संच तालुकास्तरावर वितरण करण्यात आले आहेत. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी 211 अल्प दृष्टी असलेल्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळणार आहेत.
राज्य शासनाच्या समग्र शिक्षा मोफत पाठ्यपुस्तक योजनेतून जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वितरित करण्यात येणार आहेत. येत्या आठ दिवसात 2025-26 चे नवे शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देण्याची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, शिक्षण विभागाने बालभारतीकडे तीन लाख 88 हजार 968 विद्यार्थ्यांसाठी 23 लाख 18 हजार 723 पुस्तक संच मागणी केली होती. त्या पाठ्यपुस्तकांचे वितरण सुरू आहे. त्यामुळे पहिल्या ते आठवीपर्यंतच्या तील लाख 88 हजार 968 विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळणार आहेत.
पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तके देण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाकडून तयारी सुरू आहे. तालुकास्तरावर आलेले सर्व पाठ्यपुस्तके शाळास्तरांवर वितरण करण्यात येत आहे. 10 जूनपर्यंत सर्व शाळांना पाठ्यपुस्तके देण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने दिली आहे.