

सोलापूर : शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी अनुत्तीर्ण झालेल्या शिक्षकांचे वेतन तूर्तास थांबवा, असे पत्र वेतन अधीक्षकांनी अनुदानित, अंशतः अनुदानित खासगी प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना दिले आहे. त्यामुळे टीईटी अनुत्तीर्ण झालेल्या शिक्षकांचे वेतन थांबणार आहे. त्याने त्यांच्या अडचणी वाढणार आहेत.
सन 2023 नंतर खासगी प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून नियुक्ती झालेल्या सर्व शाळेतील शिक्षकांना टीईटी परीक्षा 2019 पर्यंत उत्तीर्ण होणे बंधनकारक केले होते. मात्र, अनेक शिक्षक अनुत्तीर्ण होऊनही सेवा बजावत होते. त्यामुळे आमदार प्रशांत बंब यांनी राज्यातील टीईटी परीक्षा अनुत्तीर्ण झालेल्या शिक्षकांची माहिती मागविली होती. राज्यातील सर्व माहिती समोर आल्यानंतर आता त्या शिक्षकांचे वेतन तूर्तास थांबविण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.
टीईटी परीक्षा अनुत्तीर्ण झालेल्या शिक्षकांचे जून महिन्यातील वेतनासाठी पाठविलेले रेकॉर्ड मुख्याध्यापकांनी रिजेक्ट करून इतर शिक्षकांची माहिती पाठवावी. मुख्याध्यापकांनी टीईटी अनुत्तीर्ण झालेल्या शिक्षकांची माहिती पाठविल्यास सर्वच वेतन देयके रिजेक्ट करण्यात येतील. त्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर राहणार आहे.