

सोलापूर : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा ही रविवार, दि. २८ जून रोजी राज्यभर घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी एकूण ४७ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली असून २८ हजार २९८ परीक्षार्थी सहभागी होणार आहेत.
ही परीक्षा यशस्वीपणे घेण्यासाठी योग्य नियोजन करावे व आवश्यक मनुष्यबळ सर्व शासकीय विभागातून उपलब्ध करून घ्यावे, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत पाटील हे बोलत होते.
यावेळी शिक्षणाधिकारी प्राथमिक कादर शेख, जिल्हा कोषागार अधिकारी वैभव राऊत, कोषागार अधिकारी रणजित कदम आदी उपस्थित होते. परीक्षेसाठी किमान चार ते पाच भरारी पथकाची नियुक्ती करा. ४७ परीक्षा केंद्रावर पुरेशा प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवावा. परीक्षा पेपर कोषागार कार्यालयात व्यवस्थित ठेवून प्रत्येक परीक्षा केंद्रापर्यंत घेऊन जाण्यासाठी पोलिस विभागाने आवश्यक बंदोबस्त द्यावा. या परीक्षेसाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ यांची नियुक्ती आदेश काढावे. तसेच अतिरिक्त दहा ते पंधरा टक्के मनुष्यबळ रिझर्व्ह ठेवावे, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी पाटील यांनी दिल्या.
परीक्षा रविवार, २८ जून रोजी सोलापूर शहरातील ४७ केंद्रांवर परीक्षा होणार असून पेपर क्रमांक १ सकाळी साडेदहा ते एक यावेळेत होईल. या पेपरसाठी १२ हजार २६१ परीक्षार्थी बसणार आहेत. पेपर क्रमांक २ दुपारी अडीच ते पाच यावेळेत होईल. या पेपरसाठी १६ हजार ३७ परीक्षार्थी बसणार आहेत. परीक्षेच्या सुरळीत आयोजनासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी पाटील यांनी दिली.