

टेंभुर्णी : राज्याचे जलसंपदामंत्री डॉ.राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेत प्रांताधिकाऱ्यांनी अवैध वाळू तस्करांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. २३ रोजी अवैधपणे वाळू वाहतूक करणारा टिपर चार ब्रास वाळूसह जप्त करून तीन जणांवर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हे वाहन पोलीस ठाण्यात आणत असताना प्रांत अधिकारी यांच्या वाहनास वाळू तस्करांनी आपली वाहने आडवी लावून त्यांना रोखण्याचा व कारवाईस अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. तसेच प्रांत मॅडम यांना वाळू तस्कर आण्णा पाटील याने धक्का-बुक्की केली आहे.
याबाबत आण्णा पाटील रा.शिराळ (टें) ता. माढा, आप्पा पराडे रा. बाभळगाव, ता.माळशिरास व टिपर चा चालक गणेश काशिद रा.परीतेवाडी ता.माढा सोलापूर या तीन जणांवर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली आहे. टिपर, चार ब्रास वाळू असा एकूण वीस लाख २८ हजार रु किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत या पथकातील तलाठी प्रविण किसन बोटे (वय-३४) रा.कुर्डुवाडी यांच्या फिर्यादीवरून टेंभुर्णी पोलीस ठाण्यात वरील तीन जणांच्या विरोधात विना परवाना वाळू उपसा करून घेऊन जात असल्याने पर्यावरण संरक्षण कायदा कलम ९,१५ व भारतीय गौण खनिज कायदा कलम ४(१)४(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोसई अजित मोरे हे करीत आहेत.