करमाळा तालुक्‍यात उष्‍णतेचा पारा वाढला; बदलत्‍या वातावरणामुळे रूग्‍णसंख्या वाढली

करमाळा तालुक्‍यात उष्‍णतेचा पारा वाढला; बदलत्‍या वातावरणामुळे रूग्‍णसंख्या वाढली

जेऊर : गणेश चव्हाण मे महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत. अधून-मधून पडणारा पाऊस, ढगाळ वातावरण अशा बदलत्या हवामानाचा फटका करमाळकरांना बसत आहे. या बदलत्या वातावरणामुळे व्हायरल फिव्हरच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

सर्दी, ताप, खोकला, डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू हे आजार होण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून तापमानामध्ये वाढ झाली असून, उन्हाचे चटके आणि उकाडाही अनुभवायाला मिळतो आहे. दिवसभर कडक ऊन पडत आहे. सायंकाळी ढगाळ वातावरण होते. अधूनमधून पावसाचा हलकासा शिडकावा होतो तर, रात्री उकाडा जाणवतो. यामुळे नागरिकांना या बदलत्‍या वातावरणाचा सामना करावा लागत आहे. अनेक नागरिकांचा उष्मघाताने मृत्यू देखील झाले आहेत.

वातावरण दूषित असल्याने रोगराई देखील जलद गतीने पसरत आहे. मागिल ५ दिवसांमध्ये किमान तापमान ४० अंश सेल्सिअस इतपर्यंत गेले आहे. तालुक्यातील काही भागात दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. विहिरी आणि बोअरवेल मधील पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत येऊ लागला आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. जनावरांना चारा नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

उष्‍म्‍याने हैराण नागरिक थंडाव्यासाठी शीतपेयांकडे धाव घेऊ लागले आहेत. कोल्ड्रिंक्स, आइस्क्रीम, उसाचा रस यासारख्या दुकानांमध्ये गर्दी वाढू लागली आहे. तर वडापाव, मिसळपाव, पुरिभाजी, पावभाजी अशा हॉटेलकडे नागरिकांनी पाठ फिरविली आहे.

उष्मघात टाळण्यासाठी अशी घ्या काळजी

तहान नसतानाही प्रत्येक तासाला पाणी प्या, जास्त उन्हात फिरू नका, सौम्य रंगाचे कॉटनचे कपडे वापरा, मद्यसेवन, चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक घेणं टाळा. त्यामुळे डीहायड्रेशन होते, थंड पाण्याने अंघोळ करा. घराच्या खिडक्या शक्यतो उघड्या ठेवा, अशक्तपणा आल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढल्याने नागरिक त्रस्‍त झाले आहेत. गारवा मिळवण्यासाठी नागरिक थंड पेयांचा आधार घेत आहेत.
– श्रीकांत सानप (नागरिक, शेलगाव)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news