

टेंभुर्णी : लोकनाट्य कला केंद्रात गाण्याची बैठक लावण्यावरून झालेल्या गोळीबार प्रकरणी टेंभुर्णी पोलिसांनी अटक केलेल्या तीन आरोपीना माढा येथील प्रथमवर्ग न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
सोन्या उर्फ अविष्कार किशोर शिंदे (वय 28, रा.नवीन सोलापूर रोड, कॉलेज समोर पंढरपूर), अभिषेक दादासाहेब इंगळे (वय 29, रा.शेगाव धुमाला,ता.पंढरपूर हल्ली रा.रामबाग पंढरपूर), अंबानी उर्फ सुरज दत्तात्रय पवार (वय 23, रा.कोर्टी ता.पंढरपूर) अशी पोलीस कोठडी सूनवलेल्या आरोपींची नावे आहेत. महाराज उर्फ ज्ञानेश्वर पांडुरंग कडलासकर (रा.व्यास नारायण झोपडपट्टी अंबाबाई पटांगण पंढरपूर)असे चौथ्या फरार आरोपीचे नाव आहे.
माढा तालुक्यातील वेनेगाव येथील जयमल्हार लोकनाट्य कला केंद्रात ‘छमछम’ चा आनंद घेण्यासाठी आलेला देवा बाळू कोठावळे हा बुधवारी रात्री 1.20 वा.सुमारास बैठक लावण्यावरून झालेल्या भांडणात रिव्हॉल्व्हर मधील गोळी लागून गंभीर जखमी झाला होता. कोठावळे याच्या फिर्यादीवरून टेंभुर्णी पोलीस ठाण्यात पंढरपूर येथील वरील चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.