

मंगळवेढा : टेंभूचे पाणी वाढेगावपर्यंत आले आहे. ते माण नदीतून ओझेवाडीमार्गे भीमा नदीपर्यंत पोहचले, तर संपूर्ण मंगळवेढा भागालाही त्याचा लाभ होईल, असे प्रतिपादन पाणी परिषदेचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी केले.
शेटफळे (ता. आटपाडी) येथे झालेल्या 33 व्या पाणी परिषदेत प्रा. शिवाजीराव काळुंगे बोलत होते. या परिषदेत टेंभू उपसा सिंचन योजनेला क्रांतीवीर पद्मभूषण डॉ. नागनाथअण्णा नायकवाडी यांचे नाव देण्याचा ऐतिहासिक आणि एकमुखी ठराव पारित करण्यात आला. याप्रसंगी माजी आ. राजेंद्रअण्णा देशमुख, आ. डॉ. बाबासाहेब देशमुख, अॅड. सुभाष पाटील, प्रा. आर. एस. चोपडे, प्रा. बाळासाहेब नायकवडी, विश्वंभर बाबर, प्रा. दत्ताजीराव जाधव, गौरव नायकवडी, सचिन देशमुख, आनंदराव पाटील, शिवाजीराव पाटील, अॅड. भारत पवार आदी उपस्थित होते.
याप्रसंगी पुढे काळुंगे म्हणाले की, क्रांतीवीर स्व. नागनाथअण्णांनी दुष्काळी भागाला पाण्याचे स्वप्न दाखवले. तेव्हा लोकांना विश्वास वाटत नव्हता. पण आज ते सत्यात उतरले आहे. स्व. भाई गणपतराव देशमुख यांनी विधिमंडळात या लढ्याचे उत्तम प्रतिनिधित्व केले. स्वातंत्र्यानंतरची ही ऐतिहासिक चळवळ आता शेवटच्या टप्प्यावर आहे. त्यांच्या संकल्पनेतूनच टेंभू, म्हैसाळ आणि ताकारी यासारख्या तीन महत्त्वाच्या योजनांची अंमलबजावणी झाली, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी वैभव नायकवडी, आ. डॉ. बाबासाहेब देशमुख, गौरव नायकवडी, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, अॅड. सुभाष पाटील, हणमंतराव देशमुख, व्ही. एन. देशमुख, विष्णुपंत चव्हाण, प्रा. आर. एस. चोपडे, शिवाजीराव पाटील, आनंदराव पाटील, अॅड. भारत पवार यांनीही आपली मते मांडली. प्रास्ताविक बाळासाहेब नायकवडी तर स्वागत प्रा. सी. पी. गायकवाड यांनी केले. परिषदेचे सूत्रसंचालन आर. बी. गायकवाड यांनी केले. याप्रसंगी 13 दुष्काळी तालुक्यांच्या शेतकर्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती असलेल्या या परिषदेत अनेक मागण्या आणि जवळपास 20 ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.