

माळीनगर : दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळा क्र.2 माळीनगर या शाळेतील परिसरात एका वृक्षावर अडकलेला घारपक्षी पंखात अडकलेल्या पतंगाच्या दोर्यातून मुक्त होण्यासाठी धडपड करत होता. हे पाहून शिक्षकांनी त्या घारीला दोर्यातून काढून जीवनदान दिले.
जीवनात अडकल्यावर मदतीला धावून येणारे हातच माणुसकीचे खरे रूप असते. तेथे प्रत्येक जीवासाठी मायेचा हात असतो. याप्रमाणे त्याचे असहाय्य अवस्थेतील तडफडणे पाहून शाळेतील शिक्षक निलेश साळुंखे, जयसिंह कांबळे आणि पालक पांडुरंग पारसे यांनी क्षणाचाही विलंब न करता त्याच्या मदतीला धाव घेतली. एकत्रित प्रयत्नातून त्या पक्ष्याला मुक्तता मिळाली. हा प्रसंग केवळ एका पक्ष्याची सुटका नाही, तर ही माणुसकी, संवेदनशीलता आणि सहवेदनेची सुंदर शिकवण होती. घार पक्षाची सुटका झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी जल्लोष केला.
श्रावण महिना सुरू झाला आहे. सध्या नागपंचमी, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा या सणांची रेलचेल सुरू झाली आहे. दरम्यान पतंग उडवण्याचा आनंद सगळीकडे घेतला जातो. परंतु सध्या काच वापरून तयार केलेल्या मांजा दोर्याचा सर्रास वापर होत आहे. हा दोरा अतिशय चुकीच्या पद्धतीने तयार केला जातो. ज्यामुळे पशुपक्ष्यांसह मानवांच्याही जीवाला धोका निर्माण होत आहे. दोरा त्वचेच्या संपर्कात आल्यानंतर लगेचच मोठ्या जखमा होतात. ज्यामुळे हवेत उडणारे पक्षी यामध्ये अडकल्यानंतर सुटण्यासाठी धडपडू लागतात आणि जास्तच गुरफटून बसतात.