

सोलापूर : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्यता, नवीन संच मान्यतेच्या जाचक निकषामुळे शाळा बंद होण्याचा निर्माण झालेला धोका रोखण्यासाठी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षक संघटना एकवटल्या आहेत. या सर्व जाचक अटीच्या विरोधात आज शुक्रवारी (दि.5) जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी एक वाजता शिक्षक मोर्चा काढणार आहेत.
पदोन्नती प्रक्रिया, कंत्राटी कर्मचारी भरती धोरणामुळे राज्याच्या शिक्षण क्षेत्रात अस्वस्थता निर्माण झाली आहे. या असंतोषाला वाट करुन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्यावतीने शाळा बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील 30 पेक्षा जास्त शिक्षक संघटना एकवटल्या आहेत.
1 सप्टेंबर रोजी टीईटी अनिवार्यतेच्या संबंधाने सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर अनेकविध पद्धतीने संघटनांकडून शिक्षकांच्या सेवेला संरक्षण मिळावे, यासाठी राज्य शासनाला साकडे घालण्यात आले होते. देशातील अनेक राज्य सरकारांनी याबाबतीत पुनर्विचार याचिका दाखल केल्या आहेत. काही राज्यांनी केंद्र शासनाकडे शिक्षकांच्या संरक्षणार्थ अनुकूल प्रस्ताव सादर केले आहेत. मात्र राज्य सरकारने याबाबत साफ दुर्लक्ष केले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे नेतृत्व करणाऱ्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शिक्षक संघ थोरात गट, जुनी पेन्शन संघटना, पदवीधर व केंद्रप्रमुख शिक्षक सभा, शिक्षक भारती, मागासवर्गीय शिक्षक संघटना, शिक्षक संघ, कास्ट्राईब शिक्षक संघटना तर माध्यमिक शिक्षकांच्या टीडीएफ, मुख्याध्यापक महामंडळ, शिक्षक कृती समिती, अखिल भारतीय राष्ट्रीय शिक्षके महासंघ, एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना आदी संघटनेचे पदाधिकारी, शिक्षक आंदोलनात सहभागी होणार आहेत.