

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून जिल्ह्यातील उकृष्ट कामगिरी केलेल्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले जाते. मात्र, या पुरस्काराकडे प्राथमिक शिक्षण विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे जिल्ह्यातील शिक्षक आदर्श शिक्षक पुरस्कारापासून वंचित राहिले आहेत. त्या पुरस्काराचे वितरण केव्हा होणार, याकडे जिल्ह्यातील शिक्षकांचे लक्ष लागले आहे.
पाच सप्टेंबरला शिक्षकदिनी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून जिल्ह्यातील 25 शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात येते. त्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून ऑगस्ट महिन्यात पुरस्कारासाठी शिक्षकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. तरीही पुरस्काराचे वितरण अद्यापही करण्यात आले नाही. त्यामुळे शिक्षकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एक सर्वसाधारण, एक शिष्यवृत्तीधारक असे एकूण 11 तालुक्यातून 22 पुरस्कार तसेच दोन विशेष आणि एक माध्यमिक शिक्षक पुरस्कार असे एकूण 25 शिक्षकांना पुरस्कार दिले जाते. त्यासाठी शिक्षण विभागाकडून पुरस्कार प्रस्तावांची उलट तपासणी करून अहवालही तयार करण्यात आला आहे. परंतु प्रस्तावाची छाननी करून आदर्श शिक्षकांची निवड आणि वितरण सोहळ्यासाठी जिल्हा परिषदेला मुहूर्त मिळत नसल्याचे दिसत आहे.
प्राथमिक शिक्षण विभागाने ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी जिल्ह्यातील दोन हजार 774 शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापकांकडून 30 ऑगस्टपर्यंत प्रस्ताव मागविले होते. त्याचे प्रस्ताव शिक्षण विभागाकडे दाखल केले आहेत. त्यामधून प्रत्येक तालुक्यातून एक आदर्श शिक्षक, एक शिष्यवृत्तीधारक शिक्षक असे एकूण 22 आदर्श शिक्षकांची निवड होणार आहे. तसेच, कला व क्रीडा क्षेत्रातील प्रत्येक एक आणि माध्यमिक शाळेतील एक शिक्षक असे एकूण 25 शिक्षकांची निवड होणार आहे.